पुणे : पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी अचानक बदललेल्या हवामानामुळे विविध संसर्गजन्य आणि हंगामी आजारांचा धोका वाढू शकतो. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, पोटाचे विकार असे आजार आढळत असून, पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यामध्ये पाणी साचल्याने डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच, हवामानातील बदलांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी आहे अशांना सर्दी, ताप, पडसे होण्याची शक्यता असते. दूषित आणि गढूळ पाण्यामुळे विषमज्वर, काविळीसारखे दीर्घकालीन गंभीर आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या आजारांपासून बचाव करण्यासाठी, त्यांची लक्षणे जाणून घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

या विकारांचा धोका

  • मलेरिया : पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात ॲनोफिलिस डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मलेरियासारखा आजार फैलावतो. थकवा, ताप, डोकेदुखी ही लक्षणे आढळतात.
  • डेंग्यू : एडिस इजिप्ती डास चावल्याने शरीरात डेंग्यू संक्रमित होतो. त्यानंतर हा विषाणू रक्तामध्ये संक्रमित होतो.
  • विषमज्वर : विषमज्वर हा जीवाणू संसर्गजन्य आजार असून, दूषित पाणी आणि अन्नामुळे टायफॉइड होण्याची शक्यता असते. हा आजार इतर अवयवांवरही परिणाम करू शकतो.
  • गॅस्ट्रोएन्टेरिटिस : पावसाळ्यात आतड्यात जीवाणू संसर्ग झाल्याने हा आजार होतो. यामुळे पोटात तीव्र वेदना होतात.

काय काळजी घ्यावी?

  • पावसात भिजल्यास शरीर कोरडे करावे.
  • पाणी उकळून प्यावे.
  • बाहेरचे पदार्थ, तसेच थंडगार पदार्थ खाणे टाळावे.
  • घरामध्ये, आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी.
  • घरगुती वापरासाठी पाण्याची साठवणूक करताना, त्यामध्ये डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • घरी शिजवलेले, स्वच्छ आणि ताजे अन्न खावे.

पावसात भिजायला झाले, तर लवकरात लवकर स्वतःला कोरडे करा. गटाराच्या पाण्यात पाय ओले झाले असतील, तर लवकरात लवकर धुवावेत. शरीराला अधिकाधिक उबदार ठेवावे. पाणी उकळून घ्यावे. डॉ. अनिकेत जोशी, जनरल फिजिशियन

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये प्रामुख्याने नाक गळणे, कान फुटणे, तसेच दम लागणे (बालदमा), उलट्या, जुलाब हे आजार प्रामुख्याने आढळतात. या काळात लहान मुलांच्या बोटांच्या बेचक्यांमधे संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते. यातील बहुतेक आजार हे संसर्गजन्य असल्याने अशा वेळी मुलांना शक्यतो शाळेत पाठवू नये. पाणी गाळून प्यावे, उबदार कपडे घालावेत. पावसात भिजल्यास मुलांना त्वरित कोरडे करावे डॉ. जयंत नवरंगे, बालरोगतज्ज्ञ