पुणे : पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह विदर्भात काही भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली. मंगळवारी दिवसभरात नगर, अलिबाग परिसरात जोरदार पाऊस नोंदविला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 गेल्या आठवडय़ापासून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असले, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे केवळ दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परिसरासह मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

पुढील चार दिवसांत..

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांतील घाटविभागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात या काळात काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पर्जन्यभान..

गेल्या चोवीस तासांत कोकणातील लांजा येथे ११० मिलिमीटर, तर चिपळूण, गुहागर,वेंगुर्ला, कणकवली भागांत ८० ते ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात मालेगाव, महाबळेश्वर, नंदुरबार आदी भागांत ७० ते ८० मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाडय़ातील परतूर, वैजापूर आदी भागांत ५० मिलिमिटर, तर विदर्भातील अकोल्यात १२० आणि बुलढाण्यात ८० मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain intensity favorable conditions south konkan western maharashtra ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST