मुंबई व कोकणाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी राज्याच्या इतर भागातून तो गायबच झाला आहे. या आठवडय़ात तरी राज्यात मोठय़ा पावसाची शक्यता नाही. विदर्भात तर सध्या तापमान ४० अंशांच्या आसपास कायम असून, काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे.
मोसमी पाऊस राज्यातून गेल्या तीन आठवडय़ांपासून गायब झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. अनेक भागातील पेरण्या खूपच लांबल्या आहेत. शहरांमध्ये तर पिण्याच्या पाण्याची कपात केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मुंबई, ठाणे व घाट माथ्यावरील महाबळेश्वरसारखी काही ठिकाणे वगळता इतरत्र पावसाने पाठच फिरवली आहे. विदर्भात तर वर्धा, ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांच्या पुढे नोंदवले गेले. तिथे इतर ठिकाणीसुद्धा पारा ४० अंशांच्या जवळपास कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन-तीन दिवसांत तुरळत भागातच सरींचीच शक्यता आहे. तो या आठवडय़ाच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या उघडिपीमुळे अनेक ठिकाणची या वेळच्या पावसाची सरासरी खूपच घसरली आहे. दरम्यान, मोसमी वारे अर्थात मान्सून बुधवारी आणखी पुढे सरकला. तो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
१० टक्के लोकवर्गणीची अट रद्द
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी असलेली १० टक्के लोकवर्गणीची अट पूर्णत: रद्द करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. मात्र यापूर्वी ज्या पाणी पुरवठा योजनांकरिता अंशत: लोकवर्गणी ग्रामस्थांनी भरली असल्यास ही रक्कम संबंधित ग्रामपंचायतीस परत केली जाणार नाही. मात्र उर्वरित लोकवर्गणीची तरतूद ही पाणी पुरवठा योजनेच्या किमतीत शासनामार्फत करण्यात येईल.
मुंबई-ठाण्यात दमदार हजेरी
संपूर्ण जून महिन्यात मुंबई-ठाण्याकडे पाठ फिरवणाऱ्या मान्सूनने बुधवारी मुंबई-ठाण्यात जोरदार पुनरागमन केले. बुधवार सकाळपासून मुंबई उपनगरांत पावसाला सुरुवात झाली. दुपापर्यंत पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले होते. पावसामुळे उपनगरी वाहतूकही कोलमडली होती. त्यामुळे चाकरमान्यांना रुळांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाट काढत कार्यालय गाठावे लागले. मेट्रो-मोनो रेल्वेस्थानकांबाहेरही पाणी साचण्याचा प्रकार आढळून आला. पावसाचा जोर पाहून शाळा लवकर सोडण्यात आल्या. पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवली असली तरी उष्म्यापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद होता. येत्या २४ तासात मुंबई परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा
राज्यात आतापर्यंत केवळ २६ टक्केच पाऊस झाला असून धरणांमध्येही १९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा तसेच टंचाई उपाय योजनांना जुलै अखेपर्यंत मुदतवाढ आणि टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बठकीत घेण्यात आला. राज्यात ३० जूनपर्यंत २८.५० मिमी म्हणजेच सरासरीच्या २६.३० टक्के पाऊस झाला आहे. जूनअखेर सरासरीच्या तुलनेत १९४ तालुक्यात २५टक्के पेक्षा कमी, १२३ तालुक्यात २५ ते ५० टक्के, २८ तालुक्यात ५०-७५ टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, िहगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात सरासरीच्या ० ते २५ टक्के तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, परभणी, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्हयात २५ते ५०टक्के पाऊस झाला आहे. केवळ सांगलीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांत १९ टक्के साठा असून १४६४ टँकर्सद्वारे १३५९ गावांना आणि ३३१७ वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आतापर्यंत ६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण विभागात शून्य टक्के पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या पेरणीचे काम कमी पर्जन्यमानामुळे संथ गतीने सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.