पुण्यात गेले दोन आठवडे काही प्रमाणात पाऊस पडला. गेल्या शुक्रवारी सर्वच भागात संततधार पाऊसही पडला. मात्र, या पावसामुळे धरणांच्या साठय़ात विशेष वाढ झालेली नाही. या काळात पुण्यासाठीच्या चार धरणांमध्ये इनमीन एक ते सव्वा अब्ज घनफूट (टीएमसी) इतकीच वाढ झाली असून, साठय़ात केवळ चार टक्क्य़ांची भर पडली आहे. पुण्याच्या या धरणांमध्ये आता ५४ टक्क्य़ांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळा अखेरच्या टप्प्यात आला असला तरी पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांच्या साठय़ात फारशी भर पडलेली नाही. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी व शनिवारी दमदार पावसाची शक्यता होती. त्यापैकी शुक्रवारी संततधार पाऊस पडलासुद्धा. त्यामुळे साठय़ात वाढ होण्याबाबत नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र, या पावसामुळे साठय़ात फार वाढ झाली नाही. त्याआधी म्हणजे गेले दोन आठवडे सातत्याने वादळी पाऊस पडतच आहे. त्याचाही धरणांच्या टक्केवारीत वाढ होण्यास फारसा लाभ झाला नाही. या पावसाने आहे ती टक्केवारी टिकवून ठेवली, त्यात किंचित भर टाकली. १० सप्टेंबर रोजी पुण्याच्या धरणांचा उपयुक्त साठा पन्नास टक्क्य़ांच्या खाली म्हणजे ४९.९९ टक्के होता. त्यात साधारण चार टक्क्य़ांची वाढ होऊन आता तो ५३.८४ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.
सध्या या धरणांच्या क्षेत्रात अगदीच तुरळक पाऊस आहे. पावसाचे प्रमाण वाढेपर्यंत साठा आहे तसाच राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लगेच तरी सर्वदूर अशा संततधार पावसाची शक्यता नाही. पडला तर वादळी पाऊसच पडेल. त्यामुळे सध्या तरी या साठय़ात फारशी वाढ अपेक्षित नाही. बुधवारी सकाळी खडकवासला धरणाचा उपयुक्त साठा सुमारे २४ टक्क्य़ांवर होता. पानशेत धरणात ६६.६४ टक्के, वरसगाव धरणात ५०.४५ टक्के, तर टेमघर धरणात ४४.५७ टक्के इतका पाणीसाठा आहे.
गेल्या दोन आठवडय़ांच्या काळातील धरणांचा एकूण साठा :
(दिनांक, एकूण उपयुक्त साठा- टीएमसीमध्ये, त्याची टक्केवारी या क्रमाने)
१० सप्टेंबर २०१५        १४.५७        ४९.९९ टक्के
१७ सप्टेंबर २०१५        १४.७५        ५०.६० टक्के
२३ सप्टेंबर २०१५        १५.६९        ५३.८४ टक्के

Story img Loader