पुणे : अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील  काही भागात पावसाने सध्या जोर धरला आहे. तर विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही भागांत सरी कोसळत आहेत. पुढील पाच दिवस दक्षिण कोकणातील बहुतांश भागात आणि  उर्वरित कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवडय़ात  दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग  जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांत काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. उत्तर कोकणातील रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई विभागातही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस दक्षिण कोकणातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात  सोसाटय़ाच्या वाऱ्याचाही इशाराही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये काही भागांत २६ आणि २९ जून या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकटात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भासाठी आनंदवार्ता..

मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत पुढील एक दिवस पावसाचा जोर राहील. रत्नागिरी, रायगड  जिल्ह्यांत चार ते पाच दिवस तुरळक भागांत मुसळधारांची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथे आणखी एक दिवस मध्यम स्वरूपाचा, तर पुढील तीन ते चार दिवस तुरळक भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यांत तुरळक भागांत पाऊस, तर विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटात मुसळधारांची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain strong south konkan central maharashtra showers ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST