कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता
पुणे : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पुणे, नाशिकसह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी २२ जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २३ जानेवारीलाही कोकणात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या एकापाठोपाठ एक पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. सध्या उत्तरेकडील राज्यात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातही रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात २२ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण भाग आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवाभान…
२३ जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत विदर्भात गडचिरोली, गोंदियातही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे.
कारण काय?
राजस्थानमध्ये आता चक्रीय चक्रवात निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, २२ आणि २३ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.