पुणे : राज्यात विदर्भात अजूनही उष्णतेचा कहर सुरूच आहे. मात्र, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर या सर्वच भागात उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसाने ओढ दिल्यामुळे उष्णता वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मंगळवारी दिवसभरात राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात, तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
तापभान..
पश्चिम विदर्भापासून ते तामिळनाडूपर्यत द्रोणीय स्थिती आहे. ही स्थिती तेलंगण पार करून पुढे गेली आहे. तर, अंदमान समुद्रात सध्या चक्रीय स्थिती आहे. या स्थितीचे रूपांतर ६ मे रोजी कमी दाबाच्या पट्टय़ात होणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. ५ मेनंतर पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.