राज्यात सर्वदूर मुसळधारांचा अंदाज

सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी राज्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या ठिकाणी मुसळधारांचा पिवळा इशारा दिला आहे. या ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधारा कोसळण्याचा अंदाज आहे. गुरुवारी पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, वाशिम आणि यवतमाळ, तर शुक्रवारी के वळ बुलडाणा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी दिवसभरात मध्य महाराष्ट्रात पुण्यात १३.८ मिलिमीटर, नगरमध्ये आठ मि.मी., कोल्हापुरात तीन मि.मी., महाबळेश्वरमध्ये २७ मि.मी. आणि नाशिकमध्ये तीन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोकण विभागात मुंबईत दहा मि.मी., सांताक्रु झ येथे ३७ मि.मी., अलिबागला सात मि.मी., रत्नागिरी आणि डहाणूत प्रत्येकी तीन मि.मी., मराठवाड्यात के वळ औरंगाबादेत आठ मि.मी., तर विदर्भात अकोल्यात १९ मि.मी., अमरावतीमध्ये तीन मि.मी., नागपूरात ३२ मि.मी., वाशिममध्ये २० मि.मी. आणि वर्ध्यात नऊ मि.मी. पाऊस पडला. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगावात ३३.८ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी महाबळेश्वर येथे १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आगामी काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rainfall heavy rainfall in maharashtra akp