संध्याकाळी उशिरा पुरवठा सुरळीत करण्यात यश
संततधार पावसामुळे पुणे व पिपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत करण्यात आला.
मुसळधार पावसामुळे झाडे व फांद्या वाहिन्यांवर पडल्याने, काही ठिकाणी भूमिगत वाहिन्यांसह फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी रात्रीपासूनच महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी पावसात दुरुस्ती कामाला सुरवात केली. अनेक ठिकाणी खंडित झालेल्या भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तथापि, संततधार पावसामुळे दुरुस्ती कामात व्यत्यय येत असल्याने काही भागात नागरिकांची विजेअभावी गरसोय झाली.
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु झाला असून सायंकाळी उशिरापर्यंत शहरी भागातील १० ते १२ रोहित्र दुरुस्तीचे व वीजपुरवठय़ाबाबत ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरु होते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी विविध ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांची पाहणी केली व खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासंबंधीचा आढावा घेतला. पद्मावती परिसरातील बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सहकारनगर, कात्रज रोड, प्रेमनगर, धनकवडी आदी ठिकाणी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. िहगणे, माणिकबाग, स्वारगेट, सुभाषनगर, तुकाईनगर, धायरी, नगररोड परिसरातील खराडी, तुळजाभवानीनगर, राजाराम पाटीलनगर, तुभेनगर आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. कोथरूडमधील वारजे, शिवणेच्या काही परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. तर, डेक्कन परिसरात शनिवारी रात्री बारा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीनंतर पहाटे तीन वाजता सुरु झाला.