पुणे : मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पावसाच्या आगमनापासून या दोन्ही विभागातील घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला होता. मात्र, या भागांत तो काही प्रमाणात सुरू झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (२१ जून) मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत पालघर येथे राज्यातील सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसासाठी काही प्रमाणात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखेपासून पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरू असताना अरबी समुद्रातील शाखेकडे मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. मोसमी पाऊस सध्या मध्य प्रदेश ओलांडून राजस्थानच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. महाराष्ट्रात सध्या सध्या अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरावरूनही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. दक्षिण कोकणामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई परिसरातही काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. कोकण विभागात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट विभागांत पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

गेल्या चोवीस तासांत पालघर येथे २१०, तर डहाणू येथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभागातील गुहागर, म्हाळसा, वेंगुर्ला, वसई आदी भागांत ६० ते ७० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पेण, मालवण, देवगड, श्रीवर्धन, कुडाळ आदी भागांत मोठा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात लोणावळा, मुळशी, वेल्हे, ओझरखेड आदी भागात पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आदी भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील चार दिवस काही भागांत मुसळधारांचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यांतही प्रामुख्याने घाट विभागात चार ते पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत या विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.