किमान तापमानात वाढ

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये रविवारपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निवळून अंशत: ढगाळ वातावरण झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन गारवा कमी झाला आहे.

समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहर आणि परिसरातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. शहरात रविवारपासून आकाश अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ राहणार आहे. काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी रात्री चांगलाच गारवा जाणवत होता. ११ नोव्हेंबरला शहरात राज्यातील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. दोनच दिवसांत त्यात वाढ होऊन शनिवारी किमान तापमान १६.० अंशांवर पोहोचले. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे.