पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीवरील चक्रवातामुळे राज्यात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असल्याने रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शनिवारीही या विभागांत हलक्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी सकाळी आणि रात्री धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र १ डिसबेंरला तीव्र झाले होते. या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही भागांत मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर चक्रवात कायम राहिल्याने २ आणि ३ डिसेंबरलाही पावसाळी वातावरण कायम राहिले. मात्र, आता समुद्रातील स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा नाही. त्यामुळे रविवापर्यंत राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे. ५ डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल.

शनिवारी (४ डिसेंबर) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जवाद चक्रीवादळाचा राज्यात परिणाम नाही

बंगालच्या उपसागरात जवाद चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ४ डिसेंबरला त्याची तीव्रता वाढणार आहे. सध्या उत्तर-पश्चिम दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ पश्चिम-पूर्व दिशेने वळून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळून पुढे जाईल. ५ डिसेंबरला ते ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जाणार आहे. या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.