पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने पावसाळ्यापूर्वी तपासणी केलेल्या डासांची वाढ होण्याजोग्या स्थानांपैकी ५ हजारांहून अधिक ठिकाणी प्रत्यक्ष डासांची पैदास झालेली सापडली आहे. सोसायटय़ांमध्ये डासांची वाढ होण्यासारखी स्थळे प्रामुख्याने सापडत असून अनेक सोसायटय़ांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी आत शिरूही दिले जात नसल्याचा अनुभव या कर्मचाऱ्यांना येतो आहे.
पालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत डासोत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी ४ लाख ७६ हजार घरांना भेटी दिल्या असून, पाणी साठणारी ६ लाख ९६ हजार स्थळे (ब्रिडिंग कंटेनर) तपासली आहेत. तब्बल ५,११२ ठिकाणी पालिकेला प्रत्यक्ष डासांची वाढ झालेली आढळली.
कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले, ‘आमचे कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराची माहिती देणारी पत्रके वाटत आहेत, तसेच डासांचे ‘ब्रिडिंग स्पॉट’ शोधून ते नष्ट करत आहेत. मे महिन्यात प्रामुख्याने झोपडवस्तीत घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली, सोसायटय़ांमध्ये मात्र फवारणी करण्यास अथवा डासोत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यास कर्मचाऱ्यांना शिरू दिले जात नसल्याचा अनुभव आहे.’ पालिकेने गेल्या तीन महिन्यांत २१ हजार ब्रिडिंग स्पॉट नष्ट केले आहेत. ५६ हजार घरांमध्ये औषध फवारणी, तर २७ हजार घरांमध्ये धूर फवारणी करण्यात आली.
हॉटेल व्यावसायिकांकडून शीतपेयांच्या तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्या, शीतपेयांचे क्रेट्स निष्काळजीपणे ठेवले जात असून या वस्तूंमध्ये पाणी साठून डास वाढू शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांना अशा पडीक वस्तूंची वेळीच विल्हेवाट लावण्यासंबंधी नोटिस दिल्या जात असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. आतापर्यंत विभागाने डासोत्पत्ती शोधण्यासाठी १,८८३ बांधकामांना भेटी देऊन पाणी साठू न देण्याबद्दल नोटिस दिल्या आहेत. यातील १४ बांधकामाच्या ठिकाणी नोटिस देऊन झाल्यानंतर दंड ठोठावण्यात आला.
इथे पावसाचे पाणी साठून डास वाढू शकतात –
– इमारतींची गच्ची, तळघर, घरांची गॅलरी
– लिफ्टचे डक्ट
– घरातील वातानुकूलन यंत्रणा, कूलर
– फ्लॉवरपॉट, झाडांच्या कुंडय़ांच्या खाली ठेवलेल्या ताटल्या
– पाळीव प्राण्यांसाठीची पाणी पिण्याची भांडी
– टायर्स, फुटकी डबडी, बाटल्यांसारख्या भंगार वस्तू