पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यातही पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कोकणात काही भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या राज्यात हलका पाऊस होत असला, तरी पुढील तीन दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे. परिणामी या दोन्ही राज्यांसह तेलंगना, छत्तीसगड, सिक्कीम, पूर्व-मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पावसाची शक्यता कुठे?

  • कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतच २० ते २२ ऑगस्टला काही भागांत मुसळधारांची शक्यता, ठाणे, पालघर आणि मुंबईतही काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.
  • मध्य महाराष्ट्र- पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत २० ते २२ ऑगस्टला प्रामुख्याने घाट विभागांत मुसळधारांचा अंदाज, नाशिक, नंदूरबार भागांत हलक्या  स्वरूपाचा पाऊस.
  • विदर्भ- चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांत २०, २१ ऑगस्टला मुसळधार, तर अकोला अमरावती, वर्धा आदी भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
  • मराठवाडा- जालना, हिंगोली, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season three days rain state bay bengal ysh
First published on: 20-08-2022 at 00:02 IST