scorecardresearch

भाजपप्रमाणेच महाविकास आघाडीने पुणे – पिंपरीत उमदेपणा दाखवावा; राज ठाकरे यांचे आवाहन

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

raj thakrey

पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने दाखविलेला उमदेपणा महाविकास आघाडीने कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत दाखवावा, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. राज यांच्या या आवाहनाला महाविकास आघाडी प्रतिसाद देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा जणांना गंडा; बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पत्राद्वारे आवाहन केले आहे. त्यामुळे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या दोन आमदारांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो, या मताचा मी आहे. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरते. ही प्रगल्भता राज्याच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असे नाही, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>>राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवान केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता कसबा आणि चिंचवड विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी सर्वाना आहे. दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:46 IST