पुणे : ‘तरुणांनी भलत्या गैरसमजात, स्वप्नात न राहता वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कोणतेही सरकार असले तरी ७० हजार पदांची पदभरती होणार नाही, अशा कानपिचक्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांना दिल्या. राज्यातील मराठी मुला-मुलींना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या लागण्यासाठी कोणाचेही पाय धरावे लागले, तर त्यासाठी राज ठाकरे तयार आहे, अशी भूमिकाही ठाकरे यांनी मांडली.
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल येथे आमदार रोहित पवार यांचे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ठाकरे यांनी आंंदोलनस्थळी भेट देऊन स्पर्धा परीक्षार्थ्यांशी संवाद साधला. सद्यस्थितीचे भान देतानाच ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवरही टीका केली.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात गुंतला आहे. तरूण अभ्यास करत आहे, पण नशिबी पेपरफुटी येत आहे. तुम्हाला आलेला राग तात्पुरता असू नये; तो कायम राहिला पाहिजे. मात्र, वस्तुस्थिती आणि परिस्थिती ओळखून आंदोलनाची दिशा ठरवा. भलत्या गैरसमजात राहू नये. आरक्षण हवे म्हटले जाते, पण सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. जे काही सरकारी आहे, ते खासगी केले जात आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ सरकारी धोरणांमुळे वाया जात आहे. तरुणांना केवळ गृहित धरले जात आहे.
पैसे फेकून, जेवणावळी घालून, दारू वाटून निवडणूक जिंकता येते हा समज दूर केला जात नाही तोपर्यंत कधीही न्याय मिळणार नाही. पक्ष बदलणाऱ्यांना पुन्हा निवडून दिले जात आहे. अशा लोकांना मतदारांनी शिक्षा दिली, की ते सुतासारखे सरळ होतील, मतदारांचे म्हणणे ऐकून घेतील. लोकप्रतिनिधींच्या मनात जनतेची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही. भलत्या गैरसमजात, स्वप्नात राहू नका, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. सरकारला लगेच कळेल, पावले टाकावी लागतील, असा दबाव निर्माण झाला पाहिजे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
महारापुरुषांच्या महाराष्ट्रात दादागिरीची भाषा चालणार नाही
न्याय आणि सत्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणाला दिला, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी उपस्थित केला. प्रशासनात सुधारणा व्हावी ही विद्यार्थ्यांची माफक अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. मंत्रालयात सत्तेत बसलेल्या लोक संघर्ष करूनच आजच्या स्थानी पोहोचले आहेत. या पूर्वीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी केलेली भाषणे आठवून पाहावीत. सत्ता मिळेपर्यंत सामान्यांची भाषा करायची आणि सत्ता आली की बघून घेण्याची भाषा करायची, हे योग्य नाही,’ अशी टीका शेट्टी यांनी केली. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. येथे दादागिरीची भाषा चालणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
