“लॉकडाउन आवडे सरकारला”; महाराष्ट्रातल्या टाळेबंदीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे

बाहेरच्या राज्यांमध्ये सगळं सुरु आहे तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित केलाय.

Raj and uddhav Thackeray
पुण्यामध्ये बोलताना राज्य सरकारच्या भूमिकेवर साधला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यामध्ये असणाऱ्या करोनासंदर्भातील नियमांवर आपल्या खास शैलीमध्ये टीका केलीय. काही दिवसांपूर्वीच उपस्थित केलेला दोन लसी घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करु देण्याचा मुद्दा राज यांनी आज पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये पुन्हा उपस्थित केला. इतकचं नाही तर बाहेरच्या राज्यांमध्ये सगळं सुरु आहे तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित केलाय.

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये राज ठाकरेंनी लॉकडाउनसंदर्भात आता सरकारने आणखीन थोडी शिथिलता देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे लोकांचे उद्योग बंद झालेत, असं सांगतानाच यांना लॉकडाउन करायला काय जातंय?, असा टोलाही राज्य सरकारला राज यांनी लगावला आहे. एवढचं नाही तर लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित करत जर असं असेल तर कोणी प्रश्न विचारायलाच नकोत, असंही राज म्हणालेत.

या पत्रकारपरिषदेमध्ये राज यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. खास करुन भाजपासंदर्भात बोलताना राज यांनी आपल्या राजकीय भूमिका फार स्पष्ट असल्याचं सांगितलं. “माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. मला मोदींच्या, अमित शाहांच्या भूमिका पटत नाहीत. त्या नाही पटल्या तर मी तसं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या असंही मी सांगितलंय,” असंही राज म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना पत्र

करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्यासंदर्भात राज ठाकरे यांनी  काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पत्रही लिहिलं होतं. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला होता.  “मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी पत्रात म्हटलं होतं.

बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?, असा प्रश्न राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारलेला.

महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही

ही साथ एकाएकी जाणार नाही, असं जगातल्या तज्ञाचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही, असा टोला राज यांनी पत्रातून लगावलेला.

माझा पक्ष मुंबईकरांसोबत उभा राहील

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असंही राज म्हणाले होते. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा सुरु करावी. निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा लोकांना तरी लोकल प्रवासाचा लाभ घेता येईल आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल, असे निर्णय घ्यावेत अशी मागणी राज यांनी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray slams maharashtra state government says uddhav thackeray government likes lockdown and covid 19 restrictions scsg

ताज्या बातम्या