scorecardresearch

राज ठाकरेंची पाठ फिरताच मनसेतील अंतर्गत गटबाजी उफाळली; कार्यकर्त्यांमध्ये झटापट, हमरी-तुमरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ फिरताच शहर मनसेमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली.

raj-thackeray
राज ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ फिरताच शहर मनसेमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पक्षाच्या कोणत्याही बैठकीला का बोलाविले जात नाही, अशी विचारणा झाल्याने शिवाजीनगर विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादविवाद टोकाला पोहोचल्याने झटापटीचा प्रसंगही घडला. शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश वीटकर यांच्यात मनसे कार्यालयात झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली आहे.

राज ठाकरे यांचा पाच जून रोजी होणारा अयोध्या दैरा आणि पुणे दौऱ्यातील सभेच्या नियोजनासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच रणजित शिरोळे आणि शैलेश वीटकर यांच्यात वादावादी सुरू झाली. पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलविले जात नाही, अशी विचारणा वीटकर यांनी थेट बैठकीतच केली. त्यातून हा वाद सुरू झाला. संतप्त कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली. शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर हा वाद रंगला. दरम्यान, झटापट झाली नाही. किरकोळ वाद झाल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून शहर मनसेतील अंतर्गत गटबाजी सातत्याने चव्हाटय़ावर आली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर माजी शहराध्यक्ष वसंत मोरे नाराज झाले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केल्यानंतर शहराध्यक्षपदावरून त्यांना काढण्यात आले होते. साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपविण्यात आले होते. राज ठाकरे पक्ष कार्यालयात येत नाहीत तोपर्यंत कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही मोरे यांनी जाहीर केली होती. निवडणूक आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीतही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मतभेद पुढे आले होते. शहराध्यक्ष साईनाथ बाबरही हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यातच शहर कार्यालयात झालेली वादावादी चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, रणजित शिरोळे यांनी मात्र वादावादी आणि झटापट झाली नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाची बैठक होती. वीटकर यांच्याशी पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. असा कोणताही प्रकार झाला नाही. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray turned internal factionalism mns erupted struggle workers ysh