scorecardresearch

राज ठाकरेंना औरंगाबादेतील सभेसाठी पुण्यातील पुरोहितांकडून चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे आशीर्वाद

पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने रवाना; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा सोबत

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. मात्र तत्पूर्वी ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी राज ठाकरे यांना पुण्याती चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० ब्राह्मणांकडून आशीर्वाद दिला जाणार आहे. यासाठी पुण्यातील राजमहाल येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले आहेत.

याबाबत गुरुजी मनोज पारगावकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार आहोत. दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे. त्या करिता मंत्रांचा, दैवतांचा आशीर्वाद आणि पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तसेच, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला जाणार आहे.”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरेंना औरंगाबादेतील सभेपूर्वी खासदार इम्तिजाय जलील यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आमंत्रण, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे.

३ मे रोजी मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन –

दरम्यान ३ मे रोजी रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू झाली असून आज(शनिवार) शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच पुण्यातील राज महाल येथील निवासस्थानी कालच आगमन झाले आज १० वाजण्याच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने ते रवाना होणार आहेत. त्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज महाल बाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील १०० ते १५० गुरुजी राज ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद देखील देणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray will be blessed by brahmins by chanting mantras from all four vedas for the meeting in aurangabad msr 87 svk

ताज्या बातम्या