scorecardresearch

Premium

स्वातंत्र्य विकण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा – राजा ढाले

माणसाने स्वातंत्र्य विसरून काही साध्य होत नाही. असे ‘होकायंत्र’ होऊन जगण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा

स्वातंत्र्य विकण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा – राजा ढाले

फुले-आंबेडकर यांच्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीमध्ये अन्याय संपला पाहिजे यासाठी आमची पिढी खपली. अन्याय संपला नाही. खूप काही करायला वाव आहे. पण, करू दिले जात नाही. चळवळी मोडल्या जातात. आमचेच लोक प्रलोभनांना बळी पडतात. माणसाने स्वातंत्र्य विसरून काही साध्य होत नाही. असे ‘होकायंत्र’ होऊन जगण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा, अशा शब्दांत दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ लेखक-विचारवंत राजा ढाले यांनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
पुणे महानगरपालिके तर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजा ढाले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर दत्तात्रय धनकवडे, दीक्षा ढाले, आमदार जयदेव गायकवाड, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते बाबू वागसकर या वेळी उपस्थित होते.
एके काळी पुणे हे भटांचे आणि पेशवाईचे शहर होते. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंच्या अंगावर शेण टाकले गेले, त्याच पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देऊन पुण्याने सभ्यतेची उंची वाढवत नेली. पुण्याचा मी ऋणी आहे, असे सांगून राजा ढाले म्हणाले, मला कोणत्याही जातीबद्दल आकस नाही. जात मोडली पाहिजे. माणसाची उंची वाढली तर विचारांची उंची वाढेल. शिक्षणाने माणूस सुशिक्षित झाला असला, तरी सुसंस्कृत झाला नाही. सावित्रीबाईंच्या कार्याने विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत हे खरे असले, तरी अन्यायाचे मूळ स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत गेले आहे. ही वृत्ती समूळ छाटली गेली, तरच स्त्रियांसाठी समता हा नवा विचार अमलात येऊ शकेल.
मी उद्याचा लेखक आहे. त्यामुळे प्रकाशकाकडे जाऊन पाय चेपत बसणे माझ्या स्वभावात नाही. हे लेखन अनेकांना वर्मी लागले आहे. बंडखोर आहे. मी स्वत: मान्यतेच्या विरोधात असलो तरी या लेखनाला मान्यता मिळत आहे. फुले-आंबेडकरी वारसा अनाथ होता कामा नये ही दक्षता घेतली पाहिजे, असेही ढाले यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत ‘साधना’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे १९७२ मध्ये पुणे महापालिकेने राजा ढाले यांच्यासंदर्भात तहकुबी मांडली होती. त्याच महापालिकेतर्फे आज ढाले यांचा सन्मान होत आहे याचा आनंद होत असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, वैचारिक स्वातंत्र्याचा सर्वसमावेशक लढा सामाजिक समतेच्या मार्गानेच लढावा लागेल. ढाले यांचा गौरव हा आंबेडकरी चळवळीच्या संघर्षांचा सत्कार आहे. सामाजिक चळवळीच्या इतिहासामध्ये दलित पँथरच्या वाटचालीची नोंद घ्यावीच लागेल.
दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी आभार मानले.

lokmanas
लोकमानस: ही हुकूमशाहीकडे वाटचाल तर नव्हे?
gandhi-charkha-spinning-wheel-khadi
ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?
Gandhi_Buri__Matangini_Hazra
Gandhi Jayanti 2023 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये धारातीर्थी पडलेली ‘ही’ वीरांगना माहीत आहे का ?
maneka gandhi
ISKCON विरोधातील ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले, मनेका गांधींना १०० कोटींची मानहानीची नोटीस

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raja dhale pmc ajit pawar honour

First published on: 02-10-2015 at 03:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×