“ मी कालपर्यंत शिवसैनिक बाळासाहेबांचा होतो, उद्धव ठाकरेंचा होतो. पण या लोकांच्या अप्रवृत्तीमुळे मी आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेलो आहे.” असं म्हणत पुण्याचे शिवसेना शहर समन्वयक राजाभाऊ भिलारे यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे गटात सामील होणारे ते पुण्यातील शिवनसेनचे पहिले पदाधिकारी ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पाच दिवसांपासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणी केलेली आहे. यामुळे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फोडले. याशिवाय, राजाभाऊ भिलारे यांच्या कार्यालावर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो असल्याने तेथील बोर्डवर देखील काळे फासले. यापार्श्वभूमीवर माध्यमांना भिलारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजाभाऊ भिलारे म्हणाले, “ मी बाळासाहेबांचा, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक. पण आज काही अप्रवृत्तीचे शिवसैनिक इथे आले. माझं हे वैद्यकीय मदत कक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मदत कक्ष नावाने हे स्थापन झालेलं आहे. त्याचं पश्चिम महाराष्ट्राचं कार्यालाय पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या इथे आहे. हे सगळं काम करत असताना आज त्या लोकांना काय विद्रुप पणा वाटला. माझ्या बोर्डावर मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो व कक्ष प्रमुखांचा फोटो आहे. म्हणून त्यांनी यावर काळं फासण्याचा प्रयत्न केला. परंतु जर आपण इथे कार्यालयात बघितलं तर गरिबांसाठी काय वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात, त्यासाठी योजनेत काय काय आवश्यक आहे हे सगळं आहे. म्हणजे हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेब काय सांगायचे, शिवसैनिक कोण? शिवनसेनेचे कार्यालय कसं असावं? तर ते माझ्या वैद्यकीय कार्यालयाकडे पाहिल्यावर समजतं. मात्र या लोकांना त्यांची निवडणुकीची तिकीटं जिवंत ठेवायची असतील किंवा आणखी काही करायचं असेल, म्हणून त्यांनी असं केलं असेल. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही पण मी कालपर्यंत शिवसैनिक बाळासाहेबांचा होतो, उद्धव ठाकरेंचा होतो. पण या लोकांच्या अप्रवृत्तीमुळे मी आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेलो आहे. इथून पुढे एकनाथ शिंदे जे मला सांगतील त्यानुसार मी त्यांच्यासोबत असणार.” अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे शहर समन्वयक राजाभाऊ भिलारे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajabhau bhilare shiv sena city organizer from pune joined eknath shindes group svk 88 msr
First published on: 25-06-2022 at 16:24 IST