शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरुर तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
पुण्यात भाजप कार्यालयात गावडे यांनी पक्षप्रवेश केला. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, शिरूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे, संयोगिता पलांडे, भगवान शेळके, अशोक माशेरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचा टाकळी हाजी गट हा गेल्या अनेक दशकांपासून गावडे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे हे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’त गेले. त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी या पक्षाचे काम केले. राजेंद्र गावडे हे टाकळी हाजी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून इच्छुक होते. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टाकळी हाजी हा गट शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडे देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे गावडे नाराज झाले. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
गावडे कुटुंबाचे वर्चस्व
जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटावर गेल्या ६४ वर्षांपासून गावडे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. सलग सुमारे ५० वर्षे जिल्हा परिषदेत या कुटुंबाने प्रतिनिधित्व केले आहे. राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिरूरच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत.
