पुणे : ‘नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती संस्कृती, सभ्यता आणि जीवनाचा आधार आहे. जलसंपत्तीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘सध्या देश भयभीत आहे. निर्भयपणे बोलण्याची सुरुवात नदीपासून करावी लागेल. नदीच्या पुनरुज्जीवनातून केवळ विकास नाही तर, क्रांती झाली आहे,’ असेही ते म्हणाले. ’समाजाने नदीशी असलेले नाते पुन्हा जिवंत केले, तर देशातील जलसंकटावर प्रभावीपणे मात करता येईल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुनर्जीवित नदी : बद्दह’ या त्यांच्या हिंदी तसेच रिटा रॉड्रिग्स यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सिंह बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते जयाजी पाईकराव, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे, संस्थापक कुलगुरू डॉ. गोपालकृष्ण जोशी या वेळी उपस्थित होते.

निर्भयपणे बोलण्याची सुरुवात…

डाॅ. सिंह म्हणाले, ‘नद्यांचे स्वरूप बदलणे हे त्या भागातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे लक्षण आहे. सध्याच्या काळात नद्यांना पुन्हा जीवित करण्याची गरज आहे. सर्वाधिक सुशिक्षित लोकांचे वास्तव्य असलेल्या शहरातील नदी अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण अशा तीन मुद्द्यांनी बाधित आहे. आपल्या विकासामध्ये निसर्ग आणि संस्कृतीचा समावेश होता. हे नाते आधुनिक शिक्षण प्रणालीने तोडले. निसर्ग आणि संस्कृतीच्या मिलाफातून भावी पिढ्यांसाठी नदी जतन करणे गरजेचे आहे. सध्या देश भयभीत आहे. निर्भयपणे बोलण्याची सुरुवात नदीपासून करावी लागेल. नदीच्या पुनरुज्जीवनातून केवळ विकास नाही तर, क्रांती झाली आहे.’

डाॅ. शेंडे म्हणाले, ‘जलव्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास हे एकमेकांशी निगडित विषय असून शिक्षण, संशोधन आणि समाजाभिमुख उपक्रमांचा समन्वय साधत शाश्वत विकासाला चालना देणे ही उच्च शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे. लोक निसर्गाशी कसे वर्तन करतात याचे प्रदूषित नदी हे उदाहरण आहे. निसर्ग काय म्हणत आहे हे ऐकण्यासाठी आमच्याजवळ वेळ नाही.’ स्वाती कराड-चाटे यांनी प्रास्ताविक केले. जोशी यांनी आपल्या मनोगतामध्ये पुस्तकाचा परिचय करून दिला. प्रा. प्रभा कासलीवाल यांनी आभार मानले.

शिक्षण आणि ज्ञानामध्ये मूलभूत फरक

शिक्षण आणि ज्ञान यामध्ये मूलभूत फरक आहे. शिक्षण हे माणसाला केवळ पद, प्रतिष्ठा देते. तर, अनुभवाचे अनुभूतीमध्ये रूपांतर करण्याचे काम ज्ञान करते, असे डाॅ. राजेंद्र सिंह म्हणाले.