पुणे : ‘स्थापनेची शताब्दी साजरी करत असलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचे पुस्तक करायचे राहून गेले….’ ही कहाणी आहे राजहंस प्रकाशना’च्या अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाची.
मराठी प्रकाशन व्यवसायात स्वत:ची नाममुद्रा उमटविलेल्या ‘राजहंस प्रकाशना’चे अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण आणि प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांनी येथे काम करायला सुरुवात केल्याची ‘साठी’पूर्ती असा दुहेरी योग १ जूनला जुळून आला. त्यानिमित्ताने ‘दिगमां’शी साधलेल्या संवादातून प्रकाशनाच्या वाटचालीचे समाधान व्यक्त करताना माजगावकर यांनी अपुऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.
माजगावकर म्हणाले, ‘‘राजहंस’ला अभिमान, आनंद वाटावा अशा गोष्टींचे स्मरण होते तसेच राहून गेलेल्या प्रकल्पांची आठवण होते. श्री. ग. माजगावकर यांना संघावरचे पुस्तक करायचे होते. तसे त्यांचे माझ्याशी बोलणेही झाले होते. पण, पुढे व्यापांमध्ये त्यांना ते जमू शकले नाही हे खरे, तसे मी त्याचा पाठपुरावा करू शकलो नाही हेही खरे. राष्ट्रवादाची मांडणी करणारा दोन-तीन खंडांतील प्रकल्प स. ह. देशपांडे यांच्या मनात होता. त्यासाठी काही आर्थिक तजवीज करण्याची गरज होती. त्यातील काही भाग मी उचलू शकलो असतो. पण, तो प्रकल्पही पुढे सरकला नाही. विनय हर्डीकर यांच्याकडून ‘शेक्सपिअरच्या नाटकांची ओळख’ हा तीन किंवा पाच भागांचा प्रकल्प मनात होता. पण, तोही मी पाठपुरावा करण्याअभावी होऊ शकला नाही.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली त्या सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळील मळेकर वाड्यामध्ये राजहंस प्रकाशनाचे कार्यालय. मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या राजहंस प्रकाशन संस्थेचा प्रारंभ १ जून १९५२ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर राजहंस प्रकाशनामध्ये सहभागी झाले. १ जून १९६६ रोजी दिलीप माजगावकर यांनी राजहंस प्रकाशनामध्ये पहिले पाऊल ठेवले. राजहंस प्रकाशन ते राजहंस प्रकाशन प्रा. लि. असा या प्रकाशन व्यवसायाचा प्रवास. मोठे पुस्तक प्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडले गेले. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय सदाशिव पेठेत असले, तरी विस्तार महाराष्ट्रभर पसरला आहे. विक्रीचे असे भक्कम जाळे उभे करताना पुस्तकांचा दर्जा टिकविण्याकडे प्रकाशन संस्थेचा कल असतो. त्यामुळे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळाले.
दिगमा सांगतात, ‘प्रकाशन संस्था दर्जा टिकवून कार्यरत असताना अशा संस्थेत ६० वर्षे काम करण्याची संधी मिळणे ही माझ्या आयुष्यातील भाग्यशाली गोष्ट आहे. ही संधी मला मेव्हणे व भागीदार बाबासाहेब पुरंदरे आणि मोठे बंधू श्री. ग. माजगावकर यांनी दिली. ही वाटचाल साधी, सोपी, सरळ नव्हतीच. अनेक चढ-उतार, वाटा-वळणे, काही उंचवटे, काही खड्डे या वाटेत ओलांडावे लागले. तरीही मी म्हणेन, की हा प्रवास सुंदर होता. ‘राजहंस’ला काही महत्त्वाच्या पुस्तकांचे योगदान दिले, याचा आनंद आहे. पुढच्या काळातही काही भरीव काम करण्याचा विचार आहे.’
‘वेगवेगळ्या विचारसरणीच्या लेखकांची पुस्तके हे राजहंसचे वैशिष्ट्य. हा संस्कार श्रीगमांचा. ‘माणूस’ साप्ताहिक चालविताना श्रीगंनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली होती ती म्हणजे कोणत्याही एका विचारसरणीच्या दावणीला बांधून न घेता ते सर्व विचारांचे मुक्तपीठ असावे. त्यांच्या हाताखाली काम केल्यामुळे माझ्यावरही तसे संस्कार झाले. ‘राजहंस’कडून सर्व विचारसरणीची पुस्तके सतत प्रकाशित होत राहिली,’ अशी आठवण ते सांगतात.
‘उमद्या विचारांचे, नव्या तंत्रज्ञानाची पकड असणारे युवक प्रकाशन क्षेत्रात येत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे. पण, एक गोष्ट मान्य करावी लागेल, की करोनानंतर ज्या वेगाने प्रकाशन व्यवसाय प्रगतिपथावर जाईल, असे वाटत होते तेवढ्या प्रमाणात तो चालताना दिसत नाही. समाज माध्यमांमुळे वाचकांचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी झालेला दिसतो. पूर्वी ज्या प्रमाणात कथा, कादंबरी, वैचारिक पुस्तके वाचक आवडीने घेत होते, ती संख्या कमी होताना दिसते. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान पुढील काळात किती मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणेल हेही सांगता येत नाही. पण, माणसाच्या सर्जनशीलतेची जागा ‘एआय’ घेईल, असे वाटत नाही. समाजात होणारे बदल पचवून त्यातून समाज नव्या वाटा शोधत असताे, हा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसायातील निराशेचे मळभ दीर्घ काळ टिकून राहील, असे वाटत नाही. लवकरच जोमाने वाढेल,’ असा विश्वास दिगमा व्यक्त करतात.
