पुणे : कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात ५० टक्के वाढ करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. प्राणी संग्रहालयाला मिळणारे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च अधिक असल्याने ही शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. स्थायी समितीसमोर प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने ठेवला असून, आज (१४ नोव्हेंबर) होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे.
कात्रज येथे असलेले महापालिकेचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी राज्याच्या विविध भागांसह परदेशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या प्राणीसंग्रहालयाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही महापालिकेच्या अंदाजपत्रकात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या विस्तारीकरणानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तेथे आणले जाणार आहेत.
महापालिकेच्या या प्राणीसंग्रहालयाचा सध्या होणारा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. तसेच पुढील काळात हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये असलेल्या प्राणीसंग्रहालयांच्या तुलनेत पुण्यातील प्राणीसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क कमी आहे. त्यामुळे यामध्ये ५० टक्के वाढ करून सुधारित शुल्क आकारण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
या पूर्वी २०१८ मध्ये स्थायी समितीने दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षांत तिकीट शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हा शुल्क वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
झेब्रा, पिसोरी हरीण, सिंहाचे लवकरच आगमन
महापालिकेकडून प्राणी संग्रहालयाच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. या विस्तारीकरणानंतर प्राणी संग्रहालयात झेब्रा, पिसोरी हरीण, सिंहपुच्छ वानर हे नवीन प्राणी आणले जाणार आहेत. तसेच मार्मोसेट व टॅमरिन वानर आणि रानकुत्रे लवकरच येणार आहेत. तसेच नवीन सर्पोद्यानाची उभारणी आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा वाढविण्याचे काम केले जाणार आहे.
दरवाढीचा प्रस्ताव
गट – सध्याचे शुल्क – प्रस्तावित शुल्क (रुपयांत)
– प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे) – ४० – ६०
– लहान मुले (उंची ४ फूट ४ इंचापर्यंत) – १० – २०
– विदेशी नागरिक – १०० – १५०
– विद्यार्थी – १० – २०
