राज्यपाल सध्या कामात आहेत, सवड मिळाल्यावर सही करतील -राजू शेट्टी

भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, हे सर्व महाराष्ट्राला माहिती, असं म्हणत राजू शेट्टींचा भाजपावर पलटवार

raju-shetti
"भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, सर्व महाराष्ट्राला माहितीये" अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

विधान परिषदेतील राज्यपालांच्या कोट्यातून नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ आमदारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज साखर आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी मिश्कील भाष्य केलं. “राज्यपाल सध्या कामात आहे. त्यांना सवड मिळाल्यावर ते सही करतील,” असं सांगत “काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झालेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “राज्यातील साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकर्‍यांना तुकड्यामध्ये एमआरपी दिली आहे. ऊस दर नियंत्रण १९६६ नुसार एमआरपी देण्यास जर १५ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला, तर १५ टक्के व्याज देणं बंधनकारक आहे. या संदर्भात काही साखर कारखाने उच्च न्यायालयात गेले होते. व्याज द्यावेच लागेल, असं न्यायालयाने सांगितलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्याज दिलं गेलंच पाहिजे. अन्यथा या साखर कारखानदारांविरोधात कारवाई केली पाहिजे. तसेच सहकारमंत्र्यानी व्याज देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान केला आहे. हे व्याज तातडीने द्यावे, अन्यथा आम्ही सरकार आणि साखर आयुक्त विरोधात आंदोलन करू”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

“दिल्लीत मागील कित्येक महिन्यांपासून कृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला केरळ आणि पाश्चिम बंगाल राज्य सरकारने ठराव करून पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आपल्या राज्य सरकारने दोन्ही सभागृहात शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळण्यास मदत होईल. कृषी विधेयकाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आपल्या राज्यात कृषी विधेयक आणाचे झाल्यास ते निर्दोष असावे आणि शेतकर्‍यांच्या हिताचे असावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. “जर घाई गडबडीत लागू केलं, तर त्याला आम्ही विरोध दर्शवू,” असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. “काही नेत्यांनी शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज घेतले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अशी प्रकरणं आमच्या समोर आल्यास, आरबीआयच्या दारात जाऊन आंदोलन करू. त्याचबरोबर संबधित अधिकाऱ्याच्या सर्व प्रथम मुसक्या आवळल्या पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, हे सर्व महाराष्ट्राला माहिती : राजू शेट्टी

भाजपाने खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. त्यावर ते म्हणाले, “सत्ता नसल्यामुळे भाजपाचे नेते कासावीस झाले आहेत. त्यामुळे ते असे बोलत असतील आणि भाजपाने कुणा-कुणाची जात काढली होती. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्‍यांना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपावर पलटवार केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raju shetti sugarcane frp maharashtra governor maharashtra bjp bmh 90 svk