भूसंपादन विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त स्वत:च्या मनातली गोष्टच सांगितली. ती देशभरातील शेतक ऱ्यांच्या ‘मन की बात’ नव्हतीच, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
नव्या भूसंपादन कायद्याचा बळी शेतकरी ठरतो आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केवळ स्वत:च्या मनातलीच गोष्ट सांगितली. मोदी यांनी मूळ मुद्दय़ाला स्पर्शच केला नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली. विकासाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, हे सरकार उद्योगांना स्वस्तात जमिनी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, गावागावात लँड माफियांचा उदय झाला आहे. त्यांच्या विरोधात ‘शेती वाचवा-शेतकरी वाचवा’ आंदोलन पुकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विरोधातील भूसंपादन कायद्याला शिवसेनेने विरोध केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेनुसार ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील, असा विश्वास वाटतो, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

‘एसईझेड’च्या जमिनी परत करण्याच्या
मागणीसाठी शेतक ऱ्यांची आज पदयात्रा
राजगुरुनगर येथील विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) संपादित केलेल्या जमिनीचा शेतक ऱ्यांच्या परवानगीविना गैरवापर सुरू आहे. येथे एसईझेड न झाल्याने शेतक ऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी (२३ मार्च) हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकापासून पुण्याच्या दिशेने पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. या पदयात्रेतील सहभागी शेतकरी आळंदीच्या दिशेने रवाना होणार आहेत. पुण्यातील आंदोलनाचा कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सात वर्षांपूर्वी या एसईझेडसाठी १७ गावांतील जमिनींवर आरक्षण लागू करण्यात आले. त्यापैकी चार गावांतील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी १७ लाख रुपये प्रतिहेक्टरी दर निश्चित ठरला आणि उर्वरित १५ विकसित भूखंड देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप विकसित जमिनीही मिळालेल्या नाहीत आणि संपादित केलेली जागा मूळ उद्देश बदलून विमानतळासाठी देण्याचे घाटत आहे. कायद्याने पाच वर्षांत एसईझेड न झाल्याने जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात आणि विमानतळासाठी बाजारभावाने संपादन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.