पुणे : बहीण-भावाच्या प्रेमाचे अनोखे नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण शुक्रवारी (२८ ऑगस्ट) साजरा होत आहे. भावाच्या मनगटावर कधी राखी बांधू असा प्रश्न पडला असेल तर दिवसभरात कोणत्याही वेळी राखी बांधता येईल. याचे कारण रक्षाबंधनासाठी दिवसभर मुहूर्त आहे. त्यामुळे आपल्या आणि भावाच्या सोयीनुसार एकत्र आल्यानंतर हा आनंदाचा सण उत्साहाने साजरा करता येणार आहे.

रक्षाबंधनासाठी दिवसभर मुहूर्त असल्याची माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली. रक्षाबंधन म्हणजे भावाच्या हातावर बहिणीने प्रेमाने बांधलेला स्नेहाचा धागा. या वर्षी रक्षाबंधन शुक्रवारी (२८ ऑगस्ट) रोजी साजरे होत आहे. गुरुवारी सुरू झालेल्या नारळी पौर्णिमेची शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांनी समाप्त होत आहे. धर्मशास्त्र वचनानुसार सूर्योदयानंतर ६ घटी पेक्षा (२ तास २४ मिनिटे) अधिक काळ पौर्णिमा असलेल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी संपत असल्याने शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राखी बांधावी असे नाही. तर,संपूर्ण दिवसभरात कोणत्याही वेळी रक्षाबंधन करता येईल, असे मोहन दाते यांनी सांगितले.

तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण असले तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (२८ ऑगस्ट) आनंदात रक्षाबंधन करावे, असे दाते यांनी सांगितले. राखी पौर्णिमा आणि श्रावणी शुक्रवार एकत्र आल्याने कुलाचारानुसार सुवासिनींना पुरणपोळीचा स्वयंपाक करून कुटुंबीयांसमवेत आनंदाने भोजनाचा आस्वाद घेता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.