पुणे प्रतिनिधी : राज्यात जवळपास पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. या सभा आणि रॅलींच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले.

यावेळी आठवले म्हणाले की, राज्यातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत १७ ते १८ तर पुणे महापालिकेत २० जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच, मुंबईत ठाकरे बंधूंचे काही एक चालणार नाही, कारण मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा झटका देण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन चूक केली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ऑल इंडिया’चा अजेंडा होता. त्यांनी उत्तर भारतीय आघाडी, गुजराती आघाडी, साऊथ इंडियन आघाडी, मुस्लिम मायनॉरिटी आघाडी अशा अनेक आघाड्या बनवल्या होत्या आणि त्याचा मोठा परिणाम झाला होता. केवळ मराठी मते त्यांना मिळतील, अशा भ्रमात त्यांनी राहू नये, काही ठिकाणी मराठी मतांचा त्यांना फायदा होईल, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीसोबत नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.