केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील भाषणावर बोलताना चौफेर फटकेबाजी केली. राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावून भोंगे वाजवावेत या मताला त्यांनी विरोध दर्शविला. तसेच मशिदीचे भोंगे हे परंपरागत असल्याचं मत व्यक्त केलं. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “मशिदीचे भोंगे हे परंपरागत आहेत. तेच पुढे सुरू आहे. मशिदीसमोर भोंग्यावर हिंदूंची हनुमान चालीसा लावू नये. ते मंदिरात लावावेत, त्याला हरकत नाही. एकमेकांसमोर भोंगे लावू नयेत. मशिदीसमोर भोंगे वाजवावेत या राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत नाही, अस आठवले म्हणाले.

“शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण…”

“शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात. २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे दंगल झाली. तेथील सरपंच राष्ट्रवादीचे होते, तिथे हल्ले झाले. हल्ल्यामागे राष्ट्रवादी नाही, पण राष्ट्रवादीत काम करणाऱ्या अनेकांचा त्यात सहभाग होता, अशी माहिती आमच्याकडे आहे. शरद पवार यांनी आदेश दिला म्हणून असं केलं असं आमचं मत नाही. खालच्या पातळीवर राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करते हे खरं आहे,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

“शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला”

रामदास आठवले पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले, हे योग्य नाही. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांबद्दलची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने अजूनही विचार करायला हवा.”

“राज ठाकरे यांनी भाजपासोबत येऊ नये कारण…”

“मुख्यमंत्रीपदाच्या अडीच-अडीच वर्षे फॉर्म्युल्यावर भाजपा-शिवसेनेचं एकमत होऊ शकतं. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर करण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत येणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ ची निवडून जिंकू अशी आशा आहे. राज ठाकरे यांनी भाजपासोबत येऊ नये. त्यांचं नुकसान होईल. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, परंतु मतं मिळत नाहीत,” असं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. 

“काँग्रेसने लवकरात लवकर सरकारचा पाठिंबा काढला पाहिजे”

रामदास आठवले मविआ सरकारवर बोलताना म्हणाले, “आमची इच्छा आहे हे सरकार पडावं, पण कुठला पक्ष फुटेल असं दिसत नाही. काँग्रेस पक्षातील बरेच आमदार नाराज आहेत. ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत त्यांचा वेळोवेळी अपमान होतोय. त्यांना निधी मिळत नाही.

हेही वाचा : “स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण…”, सुजात आंबेडकरांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

“शिवसेना आणि राष्ट्रवादीच हे सरकार चालवत आहेत. त्यांच्याकडून काँग्रेसला सत्तेतून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे. अशा सरकारमध्ये काँग्रेसने राहू नये. लवकरात लवकर पाठिंबा काढला पाहिजे. काँग्रेसला विनंती आहे की सरकारमधून बाहेर पडावं,” असा सल्ला आठवलेंनी काँग्रेसला दिला.