scorecardresearch

लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे

लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोणावळ्यात स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांची सेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळे शिवसेना फुटली आहे, असे मत व्यक्त करतानाच भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीमध्ये मनसेने बिघाडी करू नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाला ऑनलाइन गंडा

पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, की शिवसेना मोडकळीस आली आहे, तिची अवस्था दयनिय झाली आहे. काँग्रेस पक्ष दुबळा झाला आहे, तर राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत ताकद कमी असल्याने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजप, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौरपद आरपीआयला मिळावे, असा ठराव आज लोणावळ्यात पार पडलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती, तर आज शिवसेना फुटली नसती.

हेही वाचा >>> पुणे : लोहगाव विमानतळावर तस्करीची ६१ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त

शिवसेना व शिंदे गटातील वादावर बोलताना आठवले म्हणाले, शिंदे गटाकडे बहुमत आहे. सर्वाधिक आमदार व खासदार त्यांच्यासोबत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह देखील त्यांनाच मिळावे. सोळा आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चुकीचा आहे. खंडपीठ याबाबत योग्य निर्णय देईल याची खात्री आहे. दसरा मेळाव्यासाठी ताकदवान शिवसेना कोणाची हे पाहून परवानगी द्यावी, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेला दिला. राज्यात फडणवीस व शिंदे सरकार चांगले काम करत आहे. ओला दुष्काळ त्यांनी जाही केला असून, केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे.

मनसेशी युती भाजपला परवडणारी नाही
भाजप, आरपीआय, शिंदे गटात मनसेचा प्रवेश होणार का, यावर आठवले म्हणाले, भाजप व आरपीआयची आघाडी आहे. त्यात मनसेने बिघाडी करू नये. मुंबईत भाजप, आरपीआय व शिंदे गटाचे मिळून दिडशेहून अधिक नगरसेवक निवडून येतील, अशी शक्यता असल्याने मनसेची आम्हाला आवश्यकता नाही. भाजपनेही मनसेसोबत युती करू नये, ही आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत आघाडी करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. मनसेच्या मराठीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असला,तरी उत्तर भारतीय व अन्य भाषिक नागरिकांबाबत त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. भाजपने मनसेसोबत युती केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम देशभरात होईल. ते भाजपला परवडणार नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या