पुणे : ‘रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार असून, महायुतीतील घटक पक्ष आहे. महायुती परिपूर्ण झाली आहे. यापुढील काळात महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका,’ अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केली. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले) भवानी पेठेतील अहिल्या आश्रम मैदान (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय) येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेक, अशोक कांबळे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

‘भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच रिपब्लिकन पक्षाचा विस्तार होत आहे. मी पक्षाची देशभर बांधणी करीत आहे. ईशान्येकडील राज्यात रिपब्लिकन पक्षाने स्थान मिळवले आहे. आंबेडकरी विचारांच्या पक्षांत महाराष्ट्रात मतभेद पाहायला मिळतात. मात्र, देशातील अन्य राज्यांत मतभेद दिसत नाही. राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करण्यात येत आहे, तसेच मतचोरीचा आरोप केला जात आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही’, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेसला जनाधार नाही. त्यांना मतदार मतदान करत नाहीत. त्यांना मत देऊन काही उपयोग होत नाही, हे आता मतदारांना समजले आहे. विरोधी पक्षांविषयी मतदारांना आत्मीयता राहिलेली नाही. त्यामुळे ते सातत्याने पराभवाला सामोरे जात आहेत’, असे आठवले यांनी नमूद केले.

महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार

‘आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविणार आहोत. नगर परिषद, नगर पंचायतीत यश मिळाले. महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार नाही. हे यश मिळवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. सत्तेत रिपब्लिकन पक्षाला योग्य स्थान दिले जाईल. पुणेकरांच्या विश्वासाला आपण पात्र ठरलो आहोत. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील कोंडीवर आठवलेंची सूचना

‘पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या जटील होत चालली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे’, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.