रामदास कदम यांची टीका

भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना प्रवेश दिला. हेच गुंड मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मागे-पुढे बसतात. त्यांचा गुण लागल्याने मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली आहे. हे गुंड शिवसेनेवर सोडण्याची भाषा भाजपनेते करतात. मात्र, शिवसेनेच्या टेकूवर मुख्यमंत्रिपद आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे. हा टेकू काढल्यास मुख्यमंत्र्यांना त्यांची ‘औकात’ कळेल, अशी टीका शिवसेनेचे राज्यमंत्री रामदास कदम यांनी चिखलीत बोलताना केली.

िपपरी पालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, राम उबाळे, विनायक रणसुभे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये बदनाम झालेल्यांना भाजपने प्रवेश दिला. राष्ट्रवादीचा भरणा झाल्याने भाजपची ‘राष्ट्रवादी’ झाली आहे. भाजप हा विश्वासघातकी पक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समस्या व प्रश्नांवर काही बोलतच नाहीत. प्रत्येकाला जेलमध्ये घालू, अशी त्यांची भाषा आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन भाजपने दिले, त्याचे काय झाले? असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या निवडणुका कधीही लागतील. आता शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. त्या वेळी पुढचा गृहमंत्री रामदास कदम असेल. त्या वेळी भाजपच्या सर्व गुंडांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेला गाडून टाकण्याची भाषा केली जाते. मात्र, शिवसेना कधीही संपणार नाही. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली पंतप्रधानांनी नोटाबंदी केली आणि सर्वसामान्य जनतेचे हाल केले. शंभर लोकांचे जीव घेतले. हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न कदम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. कोकाटे यांनी केले. सर्जेराव भोसले यांनी आभार मानले.