एक चिनी म्हण आहे की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि दुसऱ्या रुपयाचे फूल घ्या. भाकरी तुमची पोटाची भूक भागवेल. तर, फूल तुम्हाला का आणि कसे जगायचे हे शिकवेल. त्याच धर्तीवर माणसाला जगण्यासाठी कोणता ना कोणता छंद असावा लागतो. कोणी पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा छंद जोपासतो. कोणाला काडेपेटीची वेष्टने जमा करण्याचा तर, कोणाला वाद्यवादनाचा छंद असतो. अशी छांदिष्ट माणसे आपल्याच वेगळ्या विश्वात रममाण होत असतात. त्या छंदाने त्यांचे आयुष्य सुखकर होत असते. अशी नाटकाची तिकिटे जमा करण्याच्या रमेश विटकर यांच्या छंदाला साठ वर्षे पूर्ण झाली.

मुंबईच्या गिरवा येथील साहित्य संघ मंदिरामध्ये २१ ऑगस्ट १९६६ रोजी रमेश विटकर यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले नाटकाचे तिकीट खरेदी केले ते ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित प्रा. वसंत कानेटकरलिखित ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाचे. या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत होते. मराठी रंगभूमीशी संबंधित लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि अन्य रंगकर्मींच्या मुळे नाटकाच्या तिकिटांचे संकलन करण्याचा छंद मी साठ वर्षे जोपासू शकलो, अशी कृतज्ञता विटकर यांनी व्यक्त केली. अनेकांनी या संग्रहाविषयी पुस्तक लेखन करण्याचा सल्ला अमलात आणून मी या छंदाचे साठीमध्ये पदार्पण होत असताना ‘कथा नाट्य तिकीट संग्रहाची’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले. त्याला सर्व ठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला. ‘स्वखर्चाने तिकीट काढून प्रयोग पाहून नाटकाचे तिकीट व्यवस्थित जपून ठेवत रंगभूमीचा चालता बोलता इतिहास जपण्याचे एक वेगळे काम विटकर यांनी उत्तम केले आहे. कधी इतिहास लिहिण्याची वेळ आल्यास हा ठोस पुरावा ठरेल,’ असा अभिप्राय माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रमेश विटकर यांचा जन्म हैदराबादचा. तेथे वडील सरकारी डाॅक्टर असल्याने बालपण आणि शिक्षण हैदराबादला झाले. ‘वडिलांनाही नाटकाची आवड होती. तेथेच १९५७ मध्ये त्यांनी बाबुराव गोखले यांचे ‘करायला गेलो एक’ नाटक पाहिले आणि सुधीर फडके यांचे गीतरामायण ऐकले. वडिलांची बदली तत्कालीन औरंगाबादला झाली. तेथील सरस्वती भुवन शाळेच्या सभागृहामध्ये व्यावसायिक नाटके व्हायची. पत्र्याच्या खुर्च्या मांडणे, त्यावर खडूने आसन क्रमांक लिहिणे अशी कामे मी केली. तेथेच लक्ष्मण देशपांडे यांची भेट झाली. पुढे शासकीय महाविद्यायातून बी. एस्सी. झाल्यावर मुंबईच्या हाफकिनमध्ये अभ्यासक्रमासाठी माझी निवड झाली, अशा आठवणी विटकर यांनी सांगितल्या.

हाफकिनचा अभ्यासक्रम संपल्यावर माझी नेमणूक सर्पदंश, विंचूदंश, घटसर्प, धनुर्वात, श्वानदंश यावरील इंजेक्शनची निर्मिती होत असलेल्या पिंपरीच्या हाफकिनमध्ये झाली. त्यावेळी पुण्यात संगीत नाटके आणि तीही रात्री व्हायची. म्हणून मी सायकल विकत घेतली. १५ किलोमीटर पुण्यात जाऊन नाटक पाहून रात्री घरी परतायचो आणि सकाळी सात वाजता कामावर हजर होत असे. पुढे स्कूटर, मोटार घेतल्याने पुण्याला जाणे सोयीचे झाले.

प्रा. भालबा केळकर हाफकिन बघण्यासाठी आले असता १९८२ मध्ये मी त्यांना माझ्याकडील नाटकाची तिकिटे दाखवली. ‘ही तिकिटे कलाकारांना दाखवा आणि त्यांना कसा आनंद होतो ते बघा,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर मी प्रथम शरद तळवलकर यांची भेट घेतली. ‘केरातून कचरा निर्माण करतात. पण, विटकरांनी केरातून इतिहास निर्माण केला आहे,’ असा लेखी अभिप्राय त्यांनी दिला. पु. ल. देशपांडे, रमेश देव, सीमा, राजा गोसावी, विद्याधर गोखले, वसंत कानेटकर, चंदू पारखी, सई परांजपे यांच्यासारख्या दिग्गजांनी या संग्रहाचे कौतुक करून अभिप्राय लिहिले आहेत. माझ्या संग्रहासंदर्भात अभिप्राय लिहिणाऱ्या २० मान्यवरांनी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. कधी काळी देवाने मला चिचारले की ‘पुढील जन्म माणसाचा दिला तर?’ मी लगेच सांगेन, ‘मराठी रंगभूमीचा प्रेक्षक.’

vidyadhar.kulkarni@expressindia.com