भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट इन्स्टिटय़ूटला (एफटीआयआय) धमकीचे पत्र पाठविण्याची घटना ताजी असतानाच फग्र्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिटय़ूटच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख माधवी रेड्डी यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. तुमच्या संस्थेतील काही जणांनी कन्हैयाकुमारला पाठिंबा दिल्याने धमकीचे पत्र पाठविल्याचे अज्ञातांनी या पत्रात नमूद केले आहे. या पत्रातदेखील स्फोट घडविण्यासाठी वापरले जाणारे डिटोनेटर आणि स्फोटकसदृश पावडर सापडली आहे.
एफटीआयआयच्या संचालकांच्या नावाने धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (७ एप्रिल) सायंकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी रानडे इन्स्टिटय़ूटच्या संज्ञापन वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख माधवी रेड्डी यांना पत्र पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी हे पत्र पुणे विद्यापीठात शिपायाने पोहचविले. रेड्डी यांनी हे पत्र उघडले. तेव्हा त्यात धमकीचे पत्र, डिटोनेटर आणि स्फोटकसदृश पावडर आढळून आली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी मारुती चव्हाण यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले की, एफटीआयआय आणि रानडे इन्स्टिटय़ूटला पाठविलेल्या पत्रातील मजकूर एकसारखा आहे. या पत्रावर टपाल खात्याचा अस्पष्ट शिक्का आहे. एकाच व्यक्तीने हे टपाल दोन्ही संस्थांना पाठविले असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी टपालखात्याची मदत घेण्यात येणार आहे. हे पत्र पुणे शहरातून पाठविल्याचा संशय पोलिसांना आहे.
दोन्ही पत्रांमधील मजकूर एकसारखा आहे. तो इंग्रजी भाषेत आहे. कन्हैयाकुमार देशद्रोही असून त्याला पाठिंबा देऊ नका, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे विद्यापीठाचे सुरक्षा आधिकारी मारुती चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.