महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील कलाकारांच्या तोंडाला रंग लावून त्यांना सज्ज करण्याचा वसा ४५ वर्षे निष्ठेने सांभाळणारे.. सुरांची जाण असतानाही केवळ हौसेखातर ऑर्गन आणि पियानोवादन करीत रंगभूषेला प्राधान्य देणारे.. कलाप्रवासातील अनुभवांवर रंगभूषा हे पुस्तक लिहिणारे.. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्याविषयीचे सारे मनातले प्रत्येकाच्याच ओठावर आले तेही अगदी मनो‘भावे’. भावे काकांविषयीच्या मनोगतांचा पट पडद्यावर पाहताना त्यांची कारकीर्दही उलगडली.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) पुणे निर्मित ‘रंगभाषाकार’ ही भावे यांच्या प्रत्येक रंगाशी एकरूप झालेल्या जीवनप्रवासाची चित्रफीत गुरुवारी दाखविण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, डॉ. मोहन आगाशे, माधव वझे, इप्टाचे रवींद्र देवधर, सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे या वेळी उपस्थित होते. रोहिणी हट्टंगडी, प्रसाद वनारसे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शर्वरी जमेनिस, मनीषा साठे, अभिराम भडकमकर, अतुल पेठे, दीपक रेगे, रवींद्र खरे, प्रवीण तरडे यांनी या चित्रफितीच्या माध्यमातून भावे काकांच्या कामाचे विविध पैलू उलगडले आहेत.
आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चे प्रतीक असलेल्या भावे यांनी अनेक रंगकर्मीना घडविले आहे. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून इप्टाचा नगारा २१ व्या शतकातही पुन्हा वाजत असल्याची भावना अंजन श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. नाटय़ परिषद आणि राज्य सरकारतर्फे दिग्गज कलाकारांच्या अभिनय कौशल्याचे जतन केले जात आहे. त्यामध्ये रंगभूषेसाठी योगदान देणाऱ्या भावे यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, त्यांच्या कामाची दखल इप्टाने घेतली आहे, असे माधव वझे यांनी सांगितले.
 
काकांच्या काकांचे दंडवत
प्रभाकर भावे यांच्या सत्कारानंतर त्यांनी मनोगत व्यक्त करावे, असा आग्रह झाला. ‘माझ्याजवळ बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी ऋणी आहे अशा मोजक्या शब्दांत भावेकाकांनी भावना व्यक्त केली. काकांचे काका मुकुंद भावे यांनी प्रभाकर यांना साष्टांग दंडवत घालून त्यांच्या कार्याला वंदन केले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.