पुण्यातील औंध परिसरात एका १४ वर्षांच्या गतीमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलगी येथील इंदिरा वसाहतीमध्ये तिच्या कुटुंबियांसह राहते. तिची आई धुण्याभांड्याचे तर वडील मजुरीचे काम करतात. याशिवाय, तिच्या दोन बहिणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. दरम्यान, पोलीस तपासात या मुलीवर चार ते साडेचार महिन्यांपूर्वीच अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. काल ही मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातात या मुलीच्या डोक्याला मार बसल्यामुळे ती गतीमंद झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना बाहेर जाताना तिला घरात एकटे ठेवावे लागत असे. याच काळात मुलीवर अत्याचार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात घरातील लोक बाहेर गेले असताना काहीवेळा ही मुलगी घराबाहेर फिरताना आढळून आली होती. याच काळात तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडित मुलगी झोपडपट्टीत राहत असून या परिसरात कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे पोलिसांना संबंधित आरोपाची माग काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सध्या पोलिसांकडून स्थानिक परिसरात चौकशी  केली जात आहे.