पुणे : ताम्हिणी घाटात वटवट्या जातीचा ‘युरेशियन ब्लॅककॅप’ हा दुर्मीळ पक्षी आढळला होता. दुसऱ्या ठिकाणी सामान्यत: दहा दिवस राहणारा हा ‘पाहुणा’ केवळ चार दिवसांच्या मुक्कानंतर गायब झाल्याचे समोर आले आहे.

पक्षी निरीक्षक विवेक आंबेरकर यांनी सांगितले, ‘‘युरेशियन ब्लॅक कॅप’ हा पक्षी प्रामुख्याने युरोपमध्ये आढळतो. हिवाळ्यात तो दक्षिण युरोप किंवा आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. मात्र, सोमवारी (१० नोव्हेंबर) ताम्हिणी घाट परिसरात हा पक्षी दिसला. हा पक्षी भारतामध्ये दुसऱ्यांदा आला आहे. २०२१मध्ये केरळच्या मुन्नार येथे तो आढळला होता. राज्यात या पक्ष्याची मादी दिसली आहे.’

ते म्हणाले, ‘युरोपात आढळणाऱ्या या पक्षाच्या डोक्यावर काळ्या तर, मादीच्या डोक्यावर तपकिरी रंगाच्या टोपीसारखा निमुळता आकार दिसतो. हा पक्षी सामान्यत: स्थलांतर करून भारतात येत नाही. मात्र, सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास ताम्हिणी परिसरातील एका पाणवठ्यावर या पक्ष्याची मादी आढळली. मंगळवारीही ती त्याच पाणवठ्याजवळ पुन्हा दिसली. गुरुवारपर्यंत ती दिसत होती. मात्र, शुक्रवारपासून अचानक ही मादी दिसेनासे झाली.’

पक्षी निरीक्षक-अभ्यासक रामदास येनपुरे म्हणाले, ‘‘युरोशियन ब्लॅक कॅप’च्या स्थलांतराचा अभ्यास केला असता, तो साधारण दहा दिवस इथे राहील, असा अंदाज होता. मात्र, केवळ चार दिवसांच्या मुक्कामानंतर तो दिसेनासा झाला आहे. ताम्हिणी परीसरात दिसलेली ही मादी भरकटून भारताच्या दिशेने आली, की भारताच्या दिशेने या पक्ष्यांच्या स्थलांतराचा प्रवास सुरू झाला आहे, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. येत्या काही वर्षांत तो पुन्हा आढळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.’

‘ताम्हिणीतील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात’

रामदास येनपुरे म्हणाले, ‘‘ताम्हिणी घाट परिसरात स्वर्गीय नर्तक, ‘ब्लू रॉक थ्रश’सारखे अनेक दुर्मीळ पक्षी काही काळासाठी स्थलांतर करतात. त्यांचे स्थलांतर हे परागीभवनासाठी अत्यंत गरजेचे असते. मात्र, गेल्या काही वर्षांत ताम्हिणी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू आहे. रस्त्यावरच्या वाढत्या रहदारीमुळे गोंगाटात वाढ होत आहे. पक्ष्यांना विसाव्यासाठी सुरक्षित जागा मिळणे अवघड झाले आहे.’

गेल्या काही वर्षात दर वर्षी हमखास दिसणारे पक्षी आता दुर्मीळ होत आहेत. त्यामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास करून ताम्हिणीत आलेल्या ‘युरेशियन ब्लॅक कॅप’च्या स्थलांतराचा जागतिक हवामान बदलाच्या दृष्टीने अभ्यास करणे गरजेचे आहे. – विवेक आंबेरकर, पक्षी निरीक्षक