पुणे : उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे जीवनशैलीमुळे जडणारे विकार असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, असे दुर्लक्ष अनेक वेळा महागात पडू शकते. वेळीच सावधगिरी बाळगल्याने कशा पद्धतीने जीव वाचू शकतो याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. एका महिलेला उच्च रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास होता. तिच्या कुटुंबातील मधुमेहाचा पूर्वेतिहास असल्याने डॉक्टरांनी तिची जनुकीय तपासणी केली. त्यात द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मीळ जनुकीय आजाराचे निदान झाले. तिच्या प्रकृतीतील गुंतागुंत पाहून तब्बल दीड महिने उपचार करून रक्तदाब आणि रक्तशर्करा नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात यश आले. वेळीच निदान झाल्याने तिचा जीव वाचू शकला आहे.
या महिलेचे वय २८ वर्षे आहे. ती उच्च रक्तदाब व मधुमेहावरील उपचार घेत होती. तिच्या कुटुंबातील मधुमेहाचा पूर्वेतिहास समोर आल्याने तिची जनुकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत व्हॉन हिपेल-लिंडाऊ जनुकामध्ये बदल असल्याचे निष्पन्न झाले. हा दुर्मीळ जनुकीय विकार असून, विविध प्रकारच्या गाठींच्या निर्मितीशी निगडित आहे. पुढील तपासणीत तिच्या दोन्ही अधिवृक्क ग्रंथींमध्ये फिओक्रोमोसायटोमा म्हणजेच गाठी असल्याचे निदान झाले. या गाठींमुळे कॅटेकोलामाइन्स संप्रेरकांचे अतिउत्पादन होऊन रक्तदाबात तीव्र चढउतार होण्याचा धोका निर्माण होतो.
हा आजार दुर्मीळ आणि आव्हानात्मक असल्याने डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अंत:स्रावी विभागाचे प्रमुख डॉ. अनिल मेनन, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुनील म्हस्के, भूलतज्ज्ञ डॉ. राहुल व्ही. शहाबादी आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. मनोज डोंगरे यांच्या बहुविद्याशाखीय पथकाने उपचाराचे नियोजन केले. या महिलेवर या शस्त्रक्रियापूर्व ४ ते ६ आठवड्यांचा उपचार करून रक्तदाबाचे नियंत्रण आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यात आले. त्यानंतर लॅप्रोस्कोपिक पद्धतीने एकाच टप्प्यात द्विपक्षीय ॲड्रिनलेक्टॉमी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत दोन्ही गाठी काढण्यात आल्या. सुमारे तीन तासांत ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
दीर्घकालीन उपचार सुरू राहणार
शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली असून, कोणतीही गुंतागुंत झाली नाही. तिच्या दोन्ही अधिवृक्क ग्रंथी काढून टाकल्याने तिला आयुष्यभरासाठी कॉर्टिकोस्टेरॉइड रिप्लेसमेंट थेरपी सुरू करण्यात आली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे सध्या रुग्णाला मधुमेह नियंत्रणासाठी औषधांची आवश्यकता भासत नाही. पुढील काळात या आजाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी रुग्णावर दीर्घकालीन उपचार करण्यात येणार आहेत.
