पुणे : आजवर अवकाशातील रेडिओ दीर्घिका त्यांच्या जीवनकाळात केवळ एकदाच सक्रिय होत असल्याचे ज्ञात होते. मात्र, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) आणि राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी प्रथमच चार वेळा सक्रिय झालेल्या रेडिओ दीर्घिकेचा शोध लावला आहे. या दीर्घिकेचा सध्याचा म्हणजेच चौथा जीवनकाळ काही दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला असून, पहिला जीवनकाळ २१ दशलक्ष वर्षांपूर्वी संपुष्टात आल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
‘एनसीआरए’ने या संशोधनाबाबतची माहिती दिली. पवन खाडेकर, प्रा. धरम वीर लाल आणि प्रा. रमणा आत्रेय यांचा या संशोधनात सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी), अमेरिकेतील ‘व्हेरी लार्ज अरे’ (व्हीएलए), दक्षिण आफ्रिकेतील ‘मीरकॅट’ या दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीचा वापर करण्यात आला.
संशोधक पवन खाडेकर वेगळ्या आणि असामान्य रचनेच्या रेडिओ दीर्घिकांचा अभ्यास करत असताना अनपेक्षितरीत्या चार वेळा सक्रिय झालेल्या दीर्घिकेचा शोध लागला. हजारो रेडिओ दीर्घिका त्यांच्या जीवनकाळात एकदाच सक्रिय झाल्याचे आजवर ज्ञात होते. मात्र, या संशोधनात चार स्वतंत्र टप्प्यांत रेडिओ लहरींचे झोत (जेट्स) उत्सर्जित करणारी दीर्घिका आढळून आली आहे. या शोधापूर्वी तीनवेळा सक्रिय झालेल्या केवळ सहा रेडिओ दीर्घिका ज्ञात होत्या. त्यामुळे चार जन्म घेतलेल्या या दीर्घिकेचा शोध पहिल्यांदाच लागला आहे.
संशोधकांच्या चमूने तयार केलेल्या प्रतिमांतून एखाद्या प्राचीन शहराच्या उत्खननात एकावर एक अनेक संस्कृतींचे अवशेष सापडावेत त्याप्रमाणेच दीर्घिकेच्या रेडिओ लहरींच्या उत्सर्जनाचे वेगवेगळे टप्पे एकावर एक रचल्यासारखे दिसून आले. विविध रेडिओ तरंगलांबीवरील माहिती एकत्र केल्यावर दीर्घिकेचा सध्याचा म्हणजेच चौथा जीवनकाळ काही दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला असून, पहिला जीवनकाळ २१ दशलक्ष वर्षांपूर्वी संपुष्टात आल्याचे सिद्ध झाले.
चौथ्यांदा सक्रिय झालेली दीर्घिका सापडणे अविश्वसनीय होते. या बाबत ठोस पुरावे गोळा करण्यास बराच वेळ लागला, असे प्रा. रमणा आत्रेय यांनी सांगितले. तर रेडिओ लहरींच्या उत्सर्जनास कारणीभूत ठरणारी प्रक्रिया आणि उत्क्रांती समजून घेण्यासाठी अशा अनेकदा पुनर्जन्म घेणाऱ्या रेडिओ दीर्घिकांची नितांत गरज आहे. चारपेक्षाही जास्त जीवनकाळ असलेल्या अधिक कार्यक्षमतेने शोधून काढण्याची एक नवीन पद्धतही समोर आली आहे, असे प्रा. धरम वीर लाल यांनी नमूद केले. ‘एनसीआरए’चे प्रा. दिव्य ओबेरॉय म्हणाले, ‘रेडिओ दीर्घिकांशी संबंधित घडामोडी अत्यंत रंजक आहेत. विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित काही मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्यासाठी दीर्घिका ही महत्त्वाची साधने ठरतात.’
