पुणे : ‘अनेक पुरोगामी विचारवंतांनी समाजातील जुन्या, रूढ परंपरा आणि अन्यायकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. मात्र, इतकी वर्षे लोटूनही समाज अजूनही विषमता, जातीयवाद आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला दिसतो. यातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचा संस्कार पुढच्या पिढ्यापर्यंत सक्षमपणे रुजवल्यास विवेकनिष्ठ समाजाची पुनर्बांधणी शक्य आहे,’ असा आशावाद पुरस्कार्थींनी गुरुवारी मुलाखतीत व्यक्त केला.
राष्ट्र सेवा दल पुनर्गठन दिन सोहळा आणि सन्मान सोहळा गुरुवारी पार पडला. यानिमित्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराज आंबेडकर यांना साने गुरुजी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शक डॉ. शैला नरेंद्र दाभोलकर, समाजवादी नेत्या साजेदा अहमद, माजी आमदार शिरीष चौधरी आणि शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांचे नेते ॲड. सुरेश ठाकूर यांना साने गुरुजी जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला.
समाजवादी नेते आणि माजी आमदार कपिल पाटील, साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त जयवंत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दुष्काळ, एल निनो आणि आर्थिक मंदीच्या तिहेरी संकटाचा देशाला सामना करावा लागत असताना महाराष्ट्रात अंधश्रद्धा, कर्मकांड आणि द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी घातले जात असल्याची खंत माजी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्यानंतर कवी अरुण म्हात्रे यांनी सर्व पुरस्कार्थींची मुलाखत घेतली.
समाजात वाढत्या प्रतिगामी प्रवृत्तींविरोधात संघटित संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे मत भीमराज आंबेडकर यांनी मांडले. मालेगावमध्ये समाजवादी विचारांचा प्रसार करणाऱ्या साजेदा अहमद यांनी हा लढा अद्याप संपलेला नसून, तो अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगार हक्कांवरील गदा आणि वाढती भांडवलशाही याविरोधात पुन्हा व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता असल्याचे ॲड. सुरेश ठाकूर यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे कौतुक करून गिरीश चौधरी यांनी संघटनेचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला.
