पुणे : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) पुणे जिल्ह्यात अद्याप ३८ टक्के विद्यार्थ्यांचीच तपासणी पूर्ण झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत जिल्ह्यातील १० लाख ७० हजार १३२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ लाख ११ हजार ५० विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. राज्यातही तपासणीची स्थिती ५० टक्क्यांखाली असून, १ कोटी २४ लाख ४३ हजार ८८९ विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टापैकी ५३ लाख ५५ हजार ४३१ विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. राज्याची सरासरी ४३ टक्के आहे.

‘आरबीएसके’ अंतर्गत जन्मजात व्यंग, बालपणातील आजार, कमतरता आणि विकासात्मक विलंब या चार प्रमुख बाबींची तपासणी करण्यात येते. यामध्ये जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. सहा वर्षांवरील मुलांची शाळांमध्ये, तर सहा आठवडे ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची अंगणवाडी केंद्रांमध्ये मोबाइल हेल्थ टीमच्या माध्यमातून तपासणी केली जाते. तपासणीमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळल्यास बालकांना पुढील उपचारांसाठी संदर्भित केले जाते. त्यामुळे आजारांचे लवकर निदान आणि उपचारांसाठी ‘आरबीएसके’ महत्त्वाची भूमिका बजावते.

‘आरबीएसके’ माध्यमातून शस्त्रक्रियांसाठीही बालकांना संदर्भित केले जाते. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ दरम्यान हृदयशस्त्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या ८२० बालकांपैकी ८१० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. अन्य ७ हजार २५९ शस्त्रक्रियांसाठी निश्चित केलेल्या बालकांपैकी ७ हजार २५२ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. राज्यात ‘आरबीएसके’च्या १ हजार १९६ मोबाइल आरोग्य पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एक ‘एएनएम’ आणि एका फार्मासिस्टचा समावेश आहे.

धुळ्यात सर्वाधिक तपासणी

पुण्याच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये तपासणीचे प्रमाण अधिक आहे. धुळ्यात ६७ टक्के, अहिल्यानगरमध्ये ६४ टक्के, नंदुरबारमध्ये ५९ टक्के, सिंधुदुर्गमध्ये ५५ टक्के आणि गोंदियात ५२ टक्के विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे.
अंगणवाडीतील तपासणीला चांगला प्रतिसाद

अंगणवाडीतील बालकांच्या तपासणीची स्थिती मात्र तुलनेने चांगली आहे. राज्यात ६० लाख ५२ हजार ७१ बालकांच्या तपासणीचे उद्दिष्ट असताना ४१ लाख २८ हजार ६७४ बालकांची तपासणी झाली आहे. त्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. तपासणीमध्ये ६ लाख ५८ हजार ३८४ बालकांमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळल्या आहेत.

पुण्याची स्थिती

  • उद्दिष्ट : १० लाख ७० हजार १३२ विद्यार्थी
  • तपासणी : ४ लाख ११ हजार ५० विद्यार्थी
  • प्रमाण : ३८ टक्के

राज्याची स्थिती

  • विद्यार्थी तपासणीचे उद्दिष्ट : १ कोटी २४ लाख ४३ हजार ८८९
  • प्रत्यक्ष तपासणी : ५३ लाख ५५ हजार ४३१\
  • प्रमाण : ४३ टक्के
  • अंगणवाडी बालकांची तपासणी : ६९ टक्के