पुणे : यशस्वी उद्योजक, निष्णात सनदी लेखापाल, फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत नाव मिळविलेली मराठी व्यक्ती, संवेदनशील पर्यावरणवादी आणि पुण्याला, तसेच भारताला उद्योग क्षेत्राच्या जागतिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची दृष्टी असलेले द्रष्टे नेतृत्व अशी ख्याती असलेले केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सहसंस्थापक व अध्यक्ष रवी पंडित (वय ७६) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली असून, मुख्यमंत्र्यांसह उद्योग जगतातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचे योगदान देणारे पहिल्या फळीतील मार्गदर्शक रवी पंडित यांच्या निधनाने भारतातील उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी नेहमीच उद्योजकता आणि नावीन्याचा पुरस्कार केला. त्यांनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून वाहन, उत्पादन आणि ऊर्जा उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात पुढाकार घेतला. पंडित यांच्या निधनामुळे या क्षेत्रातील अभ्यासू आणि दोन पिढ्यांदरम्यानचा दुवा असा मार्गदर्शक हरपला आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात रवी पंडित यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अभ्यासू नेतृत्व, विनम्र स्वभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्यांच्या निधनाने पुण्यासह संपूर्ण उद्योगविश्वाने एक दूरदर्शी आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे.- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
रवी पंडित हे एक दूरदर्शी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्थापना करण्याच्या इच्छेने १५ वर्षांपूर्वी आम्ही प्रयत्न सुरू केले. त्या वेळी संस्थापक-विश्वस्त म्हणून ते भक्कमपणे उभे राहिले. पुण्यात जागतिक पातळीवरील थिंक टँक उभा राहू शकतो, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ‘केपीआयटी’चे संस्थापक म्हणून त्यांनी भारतीय कंपनी जागतिक पातळीवर समर्थपणे उभी राहू शकते, हे दाखवून दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतानाच सामाजिक मूल्ये जपण्याकडे त्यांचा नेहमीच कल होता. ते आपल्यात नसले, तरी त्यांचे कार्य तरुण संशोधकांना प्रेरणा देत राहील.- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
जनवाणीचे संस्थापक आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त म्हणून पुण्यातील नागरी प्रश्नांबाबत रवी पंडित यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. चेंबरचे अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेचे कार्यालय जागतिक दर्जाच्या इमारतीत स्थलांतरित केले. याचबरोबर ऑटो क्लस्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांच्या कार्यकाळात झाली. हे क्लस्टर दर वर्षी सातशे एमएसएमईना पाठबळ देत आहे. त्यांचे तंत्रज्ञान, नवोपक्रम, शाश्वत विकास याबद्दलचे दूरदर्शी विचार भविष्यात प्रेरणादायी ठरतील.- संजय किर्लोस्कर (अध्यक्ष) व प्रशांत गिरबने (महासंचालक), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर
नावीन्य, शाश्वत विकास आणि एखादा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संस्थेची उभारणी करता येते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ‘पीआयसी’चे सहसंस्थापक आणि खजिनदार म्हणून त्यांनी दिलेले योगदान आमच्यासाठी मोलाचे आहे. त्यांच्या कल्पना पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देतील.- पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी)
पुणेकरांसाठी काळाच्या पुढच्या विचारी सुधारणा रवी पंडित यांनी आणल्या. पुणे स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी त्यांनी जनवाणी संस्था सुरू केली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग, कचरामुक्त परिसर, अपघात विश्लेषण संगणक प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर संस्थेने काम केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. जनवाणी ही पुणेकरांचा विकास, आरोग्य आणि सुंदर आयुष्यासाठी होती. त्यांच्या जाण्याने जवळचा मित्र गमावल्याचे दु:ख आहे.- अनंत सरदेशमुख, ज्येष्ठ उद्योगतज्ज्ञ
