रवी पंडित हे खऱ्या अर्थाने पुण्याला जागतिक पातळीवर नेणारे नाव. त्यांनी पुण्यात व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून त्याचा विस्तार जगभरात केला. त्यांनी केवळ व्यवसायविस्तार एवढाच हेतू न ठेवता काळाची पावले ओळखून तंत्रज्ञान, वाहननिर्मिती आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत भविष्यवेधी काम केले. जागतिक दर्जाचे संशोधन आधारभूत मानून त्यांनी कंपनीचा पाया रचला.

‘केपीआयटी’ वाहन सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असून, तिचा विस्तार जगातील १५ देशांमध्ये आहे. आजघडीला अमेरिका, युरोप आणि आशियातील कोट्यवधी वाहनांना केपीआयटी कंपनी सॉफ्टवेअर सोल्युशन्स पाठबळ देत आहे. इलेक्ट्रिक वाहने, स्वयंचलित वाहने आणि हरित इंधन तंत्रज्ञानाकडे आता कल वाढू लागला असला, तरी कंपनी खूप आधीपासूनच या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रात पंडित यांनी योगदान दिले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणीचे ते सहसंस्थापक होते. तसेच, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या केंद्राला त्यांनी पाठबळ दिले. ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘थरमॅक्स’च्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया आणि आगाखान रुरल सपोर्ट प्रोग्राम इंडिया या संस्थांच्या संचालक मंडळात काम करताना त्यांनी, राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधन परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) अनेक समित्यांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. भारताच्या हरित ऊर्जा धोरणातही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेच्या उच्चस्तरीय गटात खासगी क्षेत्रातील ते एकमेव सदस्य होते. त्यांनी नुकताच ‘हृदय’ म्हणजेच ‘हायड्रोजन रिव्होल्युशन फॉर इंडियाज् डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड एनर्जी’ हा उपक्रम सुरू केला. तंत्रज्ञानाचा वापर सर्वसमावेशक विकास आणि जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा, हा यामागील हेतू होता.

पंडित यांना कोव्हेन्ट्री युनिव्हर्सिटी, अमिटी युनिव्हर्सिटी, टीव्हीएम युनिव्हर्सिटी आणि ईएमबी युनिव्हर्सिटी यांनी मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी या देशातील आघाडीच्या विज्ञान संस्थेत त्यांची फेलो म्हणून निवड झाली होती. ‘लीपफ्रॉगिंग टू पोल-व्हॉल्टिंग’ या पुस्तकाचे ते सहलेखक होते. जागतिक पातळीवर शाश्वत विकास आणि भविष्यातील वाहने याबाबत त्यांची दूरदृष्टी होती. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरला.