पुणे : टीआरपीची लढाई जिंकण्यासाठी विरोधक जन्माला आले आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथे सोमवारी केली. भाजपचा कार्यकर्ता हिंदुत्वासाठी जन्माला आला असून, देशाला विकसित राष्ट्र घडविण्याचे ध्येय घेऊन काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आश्रि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता क्रियाशील राहावा, यासाठी संघटनात्मक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या विचारधारेनुसार पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना आणि कार्यक्रम पोहोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राला नशामुक्त करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर काम करण्याची गरज आहे. नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती सरकारपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे. अशा व्यक्तींवर ‘मोका’ कायद्यानुसार कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे. युवा पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी नशामुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने संघटनेने काम करावे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

विरोधी पक्षांवर टीका करण्यापेक्षा समाजातील प्रश्न सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. नशाविरोधी मोहिमेला व्यापक स्वरूप देऊन महाराष्ट्रातील युवा पिढी सुरक्षित करण्यासाठी बूथ पातळीवर काम करावे. शहरांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भाजपविरोधात ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.