शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचलं. तसेच नालेही तुडूंब भरली. पहिल्या पावसात पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, या परिस्थितीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचण्याला पुणे महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ससूनमधील डॉक्टरांवरील कारवाईसाठी प्रतीक्षाच, महाराष्ट्र वैद्यक परिषदेने पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहवाल मागविला

नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

“एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. प्रत्येक पुणेकर ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच “पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका, कारण ‘पाऊसच जास्त झाला’ असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, पुण्यातील परिस्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया देत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन केलं आहे. “ ”पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

“येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या अनुषंगानं राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना मी दिल्या आहेत”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – पुणे: शहर काँग्रेसमध्ये लवकरच बदल, ‘आमचे’ म्हणूनच धंगेकरांना उमेदवारी दिल्याची नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

पुण्यातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पुण्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता. डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, धानोरी, विमाननगर, सोलापूर, तसेच सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. याशिवाय शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात झाडेही कोसळली होती.