Ravindra Dhangekar On Chandrakant Patil: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील अनेक शहरांत नेत्यांच्या सभा, मेळावे आणि बैठका सुरू आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, तर महायुतीमधील नेते देखील एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंद्रकात पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अमोल बालवडकरांना तिकीट का नाकारलं? याचा खुलासा करत टीका केली होती. बालवडकर यांच्यावर गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून त्यांनी टीका केली होती. चंद्रकात पाटील यांनी बालवडकर यांच्यावर केलेल्या टीकेच्या मुद्यांवरून आता माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी चंद्रकात पाटलांवर निशाणा साधला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत चंद्रकात पाटील यांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि गुंड निलेश घायवळ एकत्र दिसत असल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यावरून निशाणा साधत रवींद्र धंगेकरांनी म्हटलं की, “गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकात पाटलांनी बालवडकरांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हव.”

रवींद्र धंगेकरांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

“गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे अमोल बालवडकर यांचं तिकीट कापलं”, असं चंद्रकांत पाटील काल एका सभेदरम्यान म्हणाले. एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफवली असती का? आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे. गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकात पाटलांनी बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हव”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

रवींद्र धंगेकरांनी मंत्री मोहोळांवरही केले होते आरोप

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना शिंदे विरुद्ध भाजपा असं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं.