Pune Mahanagar Palika Election Result 2026 : शिवसेना शिंदे गटाचे पुण्यातील फायरब्रँड नेते रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे. धंगेकर यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावून दिली होती. तरीदेखील त्यांच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाबरोबर युती केली होती. यादरम्यान रवींद्र धंगेकर यांनी पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपापुढे मोठे आव्हान उभे केले रहोते. भाजपाने महापालिका निवडणुकीचे प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपविली होती. मात्र, धंगेकर हे दररोज टाकत असलेल्या डावपेचांमुळे बीडकर हे शहरातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराला जाण्याऐवजी आपल्याच मतदार संघात अडकून पडले असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मुलासह पत्नीला निवडून आणण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी सर्व ताकद पणाला लावून दिली होती. यादरम्यान प्रतिभा धंगेकर यांच्याविरोधात अजित पवार गटाने दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिली होती. आयुष कोमकर यांच्या हत्या प्रकरणात सोनाली सध्या तुरुंगात आहेत. त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांनी अजित पवार यांच्या पक्षावर टीकेची झोड उठवली होती. त्याकडे दुर्लक्ष करून आंदेकर टोळीने सोनाली यांचा प्रचार सुरूच ठेवला होता. यावेळी दोन्ही महिला उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. त्याचबरोबर विकासकामांच्या मुद्द्यावरून एकमेकींना कोंडीत पकडण्याची तयारी केली.
आणखी वाचा : ‘मैं मुंबई आकर…’ भाजपा खासदार निशिकांत दुबेंची पोस्ट; ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाले?
पुण्यातील पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न, पाणीपुरवठा आणि स्थानिक नागरी सुविधा हे या निवडणुकीत प्रमुख मुद्दे ठरली होते. या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रभाग २३ मधील मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गुरुवारी महापालिकेसाठी मतदान झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना आपापल्या विजयाचा विश्वास होता. शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होताच प्रतिभा धंगेकर पिछाडीवर पडल्या होत्या. मात्र, दुपारनंतर त्यांनी अचानक आघाडी घेतल्याने शिवसेना शिंदे गटाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
अखेर अटीतटीच्या लढतीत सोनाली आंदेकर यांनी दणदणीत विजय मिळवला, तर प्रतिभा धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सोनाली आंदेकर यांना एकूण १० हजार ८०९ मताधिक्य मिळाले, तर प्रतिभा धंगेकर यांना आठ हजार ८५९ मतांवरच समाधान मानावे लागले. यादरम्यान सोनाली आंदेकर यांच्या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल की आणखीच वाढेल असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील विजयी उमेदवार पुण्याला गुन्हेगारीपासून मुक्त करेन का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, भाजपा-शिंदे गटाचा दारुण पराभव; महापालिकेतील सत्ता गमावली
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाला अधिकच्या जागा मिळताना दिसून येत आहे. जवळपास ११० जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या अभूतपूर्व यशानंतर पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. दुसरीकडे- अजित पवार व शरद पवार यांच्या युतीला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. त्यांचे केवळ १७ जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पुण्यात काँग्रेसला १२ जागांची आघाडी मिळाली आहे, तर शिंदे गटाचे उमेदवार एक ते दोन जागांवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजपाचाच महापौर बसणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
