पुणे : ‘घाशीराम कोतवाल’मधील ’श्री गणराय नर्तन करी’ ही नांदी पुणेरी पेहरावात गाणारे ते ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताने घराघरात पोहोचलेल्या स्वरांच्या अमृतमहोत्सवी सत्कारासाठी मित्रांचा गोतावळा जमला होता. पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्या ‘कुणाच्या खांद्यावर’ या आत्मकथनपर प्रकाशन होताना आठवणींच्या स्मरणात सारेच रममाण झाले होते.

‘महान अभिनेते राज कपूर यांची गाणी मुकेश यांनी गायली. मुकेश हा राज कपूर यांचा आवाज ठरला. त्याप्रमाणे ‘सामना’ चित्रपटातील रवीने गायलेले ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गीत ऐकल्यानंतर माझ्या पुढील सर्व चित्रपटांतील महत्त्वाची गाणी आणि ‘थिम साँग’ रवी गाणार हा निर्णय मी घेतला. त्यानुसार ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील गाणी रवीने गायली,’ अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी साठे यांचा गौरव करून मैत्रीच्या आठवणींना बुधवारी उजाळा दिला.

महेक, जीवनगाणी, एस. एच. एन्टरप्रायझेस, मेराक इव्हेंटस् आणि डिंपल पब्लिकेशन यांच्या वतीने रवींद्र साठे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. प्रशांत दांडेकर यांनी शब्दबद्ध केलेल्या साठे यांच्या ‘कुणाच्या खांद्यावर’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, श्रीराम रानडे, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, नूतन साठे, प्रसाद महाडकर, समीर हंपी, कौतुक मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रमणबाग शाळेतील साठे यांचे वर्गमित्र आवर्जून उपस्थित होते.

पटेल यांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या आणि ‘सामना’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. तर, आगाशे यांनी ‘जैत रे जैत’ मधील आठवणी सांगितल्या. आळेकर यांनी रमणबाग शाळेतील आठवणी जागविल्या. ‘प्रख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना सद्दाम हुसेन आणि रवींद्र साठे यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य दिसले होते. ‘इराकमध्ये तुला डुप्लिकेट सद्दामची नोकरी आहे,’ अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

‘गुलजार आणि डॉ. जब्बार पटेल यांच्यामुळे रेखा आणि हेमामालिनी यांच्यासोबत हिंदी चित्रपटात अभिनय करण्याची संधी साठे यांना मिळाली होती. त्यांनी ती नम्रपणे नाकारली,’ असे पुस्तकातील किस्से डॉ. प्रशांत दांडेकर यांनी सांगताच हशा पिकला. मनीषा निश्चल आणि संजीव मेहंदळे यांनी रवींद्र साठे यांच्यासमवेत लोकप्रिय गाणी सादर केली. साठे यांच्या आवाजातील ‘कुणाच्या खांद्यावर’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.