पुणे : रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्का वाढ करून ते ५.५० टक्क्यांवर नेले आहेत. यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता अथवा कर्जफेडीचा कालावधी वाढणार आहे. सध्या गृहनिर्माण बाजारपेठेत सणासुदीच्या काळामुळे घरांना मागणी वाढल्याचे चित्र होते. मात्र, आता गृहकर्ज महागल्याने घरांच्या खरेदीचा निर्णय ग्राहकांकडून लांबणीवर टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्राला याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

रिझर्व्ह बँकेने रेपोदरात वाढ केल्यानंतर गृह, वाहन, वैयक्तिक आणि इतर प्रकारची कर्जे महागणार आहेत. बँकांच्या नियमांनुसार, सध्या कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा मासिक हप्ता अथवा कर्जफेडीचा कालावधी वाढणार आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला असून, या काळात ग्राहकांकडून घर खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे या वर्षी सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून घरांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा गृहनिर्माण क्षेत्राला होती. मात्र, आता व्याजदरवाढीमुळे घरखरेदीचा निर्णय लांबणीवर टाकला जाऊ शकतो. याचबरोबर आगामी काळात वाढत्या महागाईमुळे व्याज दरवाढीचे चक्र सुरूच राहिल्यास त्याचा फटका गृहनिर्माण क्षेत्राला बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या विषयी ‘गेरा डेव्हलपमेंट्स’चे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले, की रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात झालेली वाढ ही गृहनिर्माण क्षेत्रातील ग्राहकांवर थेट परिणाम करणारी ठरते. ग्राहकांच्या घरखरेदीच्या निर्णयात व्याजदर महत्त्वाची भूमिका बजावताे. सध्या झालेली व्याजदरवाढ कमी आहे. त्याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. मात्र, आगामी काळात व्याजदरवाढीचे चक्र सुरू राहिल्यास त्याचा गंभीर परिणाम ग्राहक आणि गृहनिर्माण क्षेत्रावर होऊ शकतो.

या बाबत ‘क्रिसाला डेव्हलपर्स’चे व्यवस्थापकीय संचालक आकाश अगरवाल म्हणाले, ‘रेपो दरात झालेल्या वाढीचा गृहनिर्माण बाजारपेठेवर मर्यादित स्वरूपाचा परिणाम होईल. या वाढीमुळे ग्राहक कर्ज घेण्याबाबत बारकाईने विचार करेल. मात्र, या एका रेपो दरवाढीमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील मागणीवर फारसा परिणाम होणार नाही. पुणे परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासामुळे घरांना मागणी वाढली असून, सणासुदीच्या काळात ती कायम राहण्याची शक्यता आहे.’

खर्चाची क्षमता कमी

वाढत्या महागाईचा दबाव आणि जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव यामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे थेट ग्राहकांवर परिणाम होणार असून, त्यांची खर्चाची क्षमता कमी होणार आहे. त्यातूनच घरांच्या मागणीवर परिणाम होईल. सणासुदीचा हंगाम हा गृहनिर्माण क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात घरांना मागणी वाढते. मात्र, याच काळात व्याजदर वाढल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी होईल, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी स्पष्ट केले.

खर्चाचे गणित बिघडणार

रेपो दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची नाही. इंधनाचे दर आधीच जास्त आहेत, महागाईमुळे घरगुती खर्चाचे गणित बिघडत आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रेपो दरात झालेल्या वाढीमुळे कर्जाचे व्याजदर वाढतील आणि हा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांना सहन करावा लागेल. मात्र, व्याजदरात झालेली किरकोळ वाढ घरांच्या मागणीवर फारसा परिणाम करेल, असे वाटत नाही, असे व्हीटीपी रिॲल्टीचे मुख्याधिकारी व कार्यकारी संचालक सचिन भंडारी यांनी नमूद केले.